• गुरुचरित्र ||अध्याय आठवा||
*!! श्री गुरूदेव दत्त !!*
*श्री गुरुचरित्र अर्थ व बोध*
*अध्याय आठवा*
*महाबळेश्वर महिमा*
आठव्या अध्यायातही गोकर्ण स्थान महिमाच आला आहे. त्याच बरोबर प्रदोष व्रताचे महत्व सांगितले आहे. नामधारक सिध्दांना प्रश्न विचारणार आणि कथाभाग पुढे सरकणार आणि ते गंगाधर सरस्वतीने सांगितल्याचा उल्लेख त्या अनुषंगाने येणार.
नामधारकाने विचारणा केली की गोकर्ण महाबळेश्वराचे ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभेष किती दिवस राहिले? सिद्ध म्हणतात श्रीपाद श्रीवल्लभ तीन वर्षे गोकर्णाला गुप्त रूपाने राहिले नंतर ते कुरवपूरला आले. हे कुरवपूर आज कुरुगड्डी या नावाने प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशात कृष्णा नावाच्या स्टेशनपासून २७ किलो मीटरवर एक बेट कृष्णानदीच्या प्रवाहात एक मैल लांब अर्धा मैल रुंद असे बेट आहे. याला पूर्वी अग्रहार असे नाव होते. इथे पूर्वी चांगले चांगले वेदपाठी ब्राम्हण राहात होते. त्यातील एका वेदशास्त्रसंपन्न ब्राम्हण व त्याची पत्नी अंबिका यांना संतती वाचत नव्हती. अनेक तीर्थाटने केली नवसायास केले तेव्हा एक पुत्र वाचला फार प्रयत्नाने पुत्र झाला म्हणून स्वाभाविकपणे आई त्याचे कोडकौतुक करीत होती. पुढे त्याची मुंज झाली. पिता त्याला विद्या शिकवण्याचा प्रयत्न करी पण तो मंदबुद्धी निघाला. त्याला कितीही शिकविले तरी तो विसरून जाई. विद्याभासानिमित्त पिता त्याला मारीतही असे. अनेक नवसानंतर झालेला हा पुत्र "अजागळ" निघाला म्हणून दोघेही चिंताकुलीत होते. तशातच तो ब्राम्हण निवर्तला त्यामुळे कुटुंबाची अन्नान दशा झाली. विद्या येत नसल्याने त्याला विवाहयोग्य झाला पण कुणी कन्या देत नव्हते. लोक त्याची निंदा करीत, असून नसल्यासारखे जिणे आई आणि मुलाला असह्य झाले होते. वेदशास्त्रसंपन्न ब्राम्हणाचे पोटी मूर्ख जन्मल्यामुळे त्याची छी:थु अधिकच होत होती. कारण त्याच्या पित्याच्या विद्वत्तेमुळे त्याचा नांव लौकिक होता. त्याच्या नावाला काळिमा लावण्याचे वर्तन हा मुलगा करीत होते. बरे! तो तरी काय करणार त्याचे प्रारब्धच असे होते. अर्थात माता पित्याचे कर्म असे असावे कि ज्यामुळे सुपुत्र पोटी जन्माला येतात. वासुदेव-देवकीच्या सदाचारामुळे -सत्कर्मामुळे श्रीकृष्णाला त्यांचे पोटी जन्म घ्यावा वाटला. एखाद्या जन्मात ज्याची साधना अपूर्ण राहिली. तपश्चर्या पूर्ण झाली नाही त्याला गीतेने योग भ्रष्ट म्हटले आहे. असे योग भ्रष्ट त्याच्या इच्छापूर्तीसाठी पवित्र आणि साधनसंपन्न घरात पुनर्जन्म घेतात. अर्थात चांगले पुत्र आणि चांगले माता-पिता या दोहोसाठीही पूर्वकर्मे चांगले असावे लागते. आता पूर्व कर्म ज्ञात नाही आणि सोबत आणले हे संचिताची शिदोरीही चांगली नाही, निदान आताचे तरी कर्म चांगले करावे. म्हणजे दोष कमी कमी होतील. असा अर्थ त्या विप्रस्त्रीने जाणून घेतला. विद्वान ब्राम्हणाची ती पत्नी आहे. तिला इतके नक्कीच कळत होते. त्यामुळे एके दिवशी ती आपल्या पुत्राला घेऊन गंगेमध्ये प्राण त्याग करण्यासाठी गेली, तिथे श्रीपाद योगी स्नानाला आले होते. त्यांनी ते दृष्य पहिले आणि तात्काळ त्या दोघांना बोलावले. "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती" या न्यायाने श्रीपाद योग्यांच्या मनात करूणा दाटली. शिवाय आपल्यासमोर कुणी आत्महत्येसारखे महापातक करीत असेल तर मानव धर्म म्हणून सुद्धा शांत बसणे अशास्त्र आहे. त्या पातकापासून परावृत्त करणे हे तर त्यांचे आद्य कर्तव्यच होते. परमेश्वरी अवतारच मुळी जन कल्याण आणि साधूंचे संरक्षण यासाठी आहे. त्यामुळे श्रीपाद योगींनी त्यांना बोलावून सांगितले अरे असे निराश होऊ नका आणि आत्महत्या करून आणखी पापांचे नग वाढवू नका विप्रपत्नी अंबिका म्हणाली देवा जन्मोजन्मी असा मूर्ख पुत्र होऊ देऊ नये असा काही उपाय सांगा. आपण जसे विश्ववंद्य आहेत तसेच सर्वांना पूज्य असा पुत्र निदान पुढच्या जन्मी तरी व्हावा असा उपाय सांगा. श्रीपाद योगी म्हणाले स्कंदपुराणातील एक कथा सांगतो ती एक. उज्जैन नगरात भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याचा मित्र मणिभद्र महाबळेश्वर लिंगाची पूजा करीत असे त्याचे फळ म्हणून त्याला एक माणिक ईश्वराने प्रसादरूप दिले. त्याच्या केवळ अस्तित्वाने आसमंत प्रकाशमान होत होता. या मणिभद्राची पूजा तेथील गुरे राखणाऱ्या पोरांनी पाहिली आणि स्वाभाविकपणे तशीच पूजा पोरांनीही केली. खेळच तो ! खेळ संपला पोरे पसार झाली. त्यातील एका पोराची मात्र त्या लिंगापाशी तंद्री लागली. तो तेथून हलेचना मग त्याच्या मातेने पूजा मोडून त्याला ओढून घरी नेऊ लागली. तेव्हा मात्र तो पोर मूर्च्छा येऊन पडला तेव्हा शूलपाणी-महादेव प्रसन्न झाला. ते बालक ईश्वरास विनवू लागले. देवा माझ्या मातेने पूजा मोडली.... क्षमा कर, पूजा मोडण्याचे पातक त्या लहान पोरालाही कळाले यातून बोध घेऊन, आता एकावर एक पूजा करतात त्यांना ते टाळण्याची बुद्धी झाली तर तो सुदिन! मंदिरात सर्वानाच आपला अधिकार मोठा आहे असे वाटते आणि प्रत्येकजण पहिली पूजा मोडून आपली स्वतःची पूजा करतो, असो मातेच्या वतीने क्षमा याचना केल्यावर त्या लहान बालकाचे ते औदार्य म्हणावे, मातेविषयी प्रेम म्हणावे की माता हेच आपले सर्वस्व आहे. याची त्याला जाण आहे म्हणावे. परमेश्वराने त्याच्या मातेला क्षमातर केलीच पण पूजा पाहिली म्हणून कृष्णासारखा पुत्र तिला दिला. अशी कथा सांगून श्रीपाद श्रीवल्लभांनी शनिवारी त्रयोदशीला प्रदोष पूजा करण्याविषयी त्या अंबिकेला सांगितले. या शिवाय त्या मंदमती पुत्राला दीक्षा देऊन ज्ञान संपन्न केले.
माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्यानेच श्री गुरूंची भेटी झाली असे मनी मानून ती विप्रस्त्री श्रीपादांचीच ईश्वर म्हणून प्रदोषपूजा करू लागली आणि सर्व इच्छितास प्राप्त करिती झाली. इथे आठव्या अध्यायाची समाप्ती झाली.
*II श्री दत्तात्रेयार्पणमस्तु II*