गुरुचरित्र
*!! श्री गुरूदेव दत्त !!*
*श्री गुरुचरित्र अर्थ व बोध*
'यावतजीवेत सुखंजीवेत” असे चार्वाक मत आहे. या वचनाच्या उत्तरार्धातील चरणांमुळे याचे “सुभाषित” झाले नाही. माणूस जन्माला आला तेंव्हापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुखाचीच अपेक्षा करीत असतो. त्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. हा प्रयत्न सन्मार्गी असावा, असाच उपदेश सगळ्याच उपलब्ध साधनातून होणे हे उन्नतीला पूरक होईल. “ऋणं कृत्वा घृतं पिबेत” म्हणून अनाचार वाढवणे आणि अजून पुढे जाऊन “भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनं कृत:” असे म्हणून त्याचे वागणे – बेलगाम – अनिर्बंध करणे हे दु:ख पर्यावसायी आहे याची जाणीव असणे गरजेचे आहे. हेच काम आपल्या धार्मिक वाड्मयाने केले आहे. माणूस इतक्या भिन्न भिन्न प्रकृतीचा आहे. विचारांचा आहे की, त्याला त्याच्या त्याच्या विचारानुरूप आवडीनुसार ह्या सुखप्राप्तीचे मार्ग हवे असतात. त्याला आवडणाऱ्या रुपात त्याचे श्रद्धा केंद्र तो ठरवीत असतो. तो बुद्धिमान आहे. त्याला बौद्धिक स्वातंत्र्य आहे. मग असे करणे अनुचित ठरत नाही. देव त्यामुळेच भक्ताला त्याला आवडणाऱ्या रुपात त्याचे अस्तित्व प्रगट करीत असतो. ज्याला माणूस सुख, आनंद म्हणतो ते शारीरिक व मानसिक पातळीवरचे असते. शारीरिक पातळीवर त्याला सुख ही संज्ञा आहे तर मानसिक पातळीवर सुख मिळेलच असे नाही, मात्र मानसिक सुखामुळे आनंदामुळे शारीरिक सुखाची अभिलाषा लयाला जाते, त्याला गौणत्व येते किंवा देहभान सुटते म्हणून मानसिक पातळीवरील सुख–आनंद श्रेष्ठ ठरतो व त्यासाठी माणूस साधने शोधीत असतो. याच मार्गावर ३३ प्रकारचे (३३ कोटी नव्हे !) देवांची प्राप्ती अनुभूती झाली याच मार्गात भगवत साधना कशी आली असे वाटणे सहज शक्य आहे. पण आनंदाचेच दुसरे नाव भगवंत आहे. “भग” या शब्दाचा गुण असा अर्थ भागवताने प्रतिपादीला आहे आणि षड्गुनैश्वर्य संपन्न तो भगवान गुणवान असे वर्णन केले आहे. १) यश २) श्री ३) औदार्य ४) ज्ञान ५) वैराग्य ६) ऐश्वर्य हे ते सहागुण आहेत. असो, माणूस आपल्या आवडीप्रमाणे आनंद प्राप्तीसाठी प्रतीके, रूपके निवडतो त्यामुळे कधी कधी त्याची निष्ठा इतकी एकांगी होते की त्याला इतर रूपे प्रतिके तुच्छ तरी वाटतात किंवा वर्ज्य तरी वाटतात. एकदा एक डॉक्टर माझ्याकडे मुलीची पत्रिका व्यवस्थित पाहिली. विवाह प्रतिबंधक योग होता, त्यांना “विनायक शांती” करा म्हणालो. ते एकदम म्हणाले आमच्या इथे श्री गणेशाची उपासना वर्ज्य आहे हो! काय आश्चर्य आहे. कोणत्याही कार्याचा आरंभ ज्याच्या पुजनाशिवाय होत नाही. किंबहुना ‘श्री गणेश उपासनावर्ज्य आहे म्हणणे एक तर घोर अज्ञान तरी आहे किंवा उपास्याविषयी वृथाभिमान तरी आहे. कारण श्री गणेश हे केवळ आराध्य दैवतच नाही तर तोच प्रत्यक्ष कार्यारंभ आहे. असो. निष्ठा किंवा भक्ती अशी एका टोकाला कशी जाते आणि पंथोपंथ व संप्रदाय कसे निर्माण होतात हे या एका उदाहरणावरून चांगलेच समजू शकते. या पंथामध्ये गाणपत्य, शाक्त, महानुभाव असे दैवतानुसार पंथ आहेत, तसे उपपंथात स्मार्त व भागवत ही आहेत. संप्रदायात वारकरी, हरिदास आहेत. यांच्या उपासनेच्या पद्धतीतही भेद आहेत. भक्तीसुत्र एकच असले तरी मार्ग किंवा पद्धती भिन्न आहेत, त्यालाच पंथोपपंथ म्हणतात. भगवंताच्या उपासनेसाठी पूजन, अर्चन, कीर्तन, मनन, श्रवण असे नवविध मार्ग आहेत त्यापैकी परमेश्वर लीला वर्णन – वाचन हे ही महत्वाच आहे. ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे वेगवेगळे ग्रंथ वाचन – पारायणादी भक्ती होते असते. त्यात दत्त संप्रदायात “श्रीगुरूचरित्र” या ग्रंथाच्या पारायणाची – वाचनाची महती फार मोठी आहे.
दत्त संप्रदायाचे वर्णन करीत असता, सिध्दमुनींनी गुरूच्या मूळपिठाविषयी व पुढे त्यांच्या विस्ताराविषयी प्रश्न केला तेंव्हा शंकर, विष्णू, ब्रम्हा नंतर वसिष्ठ, पराशर, व्यास, आचार्य गौडपाद ते कृष्णसरस्वती पर्यंतचा क्रम सांगितला आहे. यावरून या संप्रदायाला असलेली परंपरा तर लक्षात येतेच पण कालौघात अनेक आघातानंतरही ती उत्तम टिकूनच आहे असे नव्हे तर उत्तरोत्तर वृद्धिंगत होत आहे, यातच त्याची महत्ता, लोकप्रियता आणि परीणामकरिता प्रत्ययास येऊ शकते. असा हा ग्रंथ “श्रीगुरुचरित्र” साहित्यदृष्ट्या ग्रंथ या पदाला, गुरु या दृष्ट्या “ग्रंथगुरु”पदाला आणि भावनिकदृष्ट्या ग्रंथदैवत या पदाला पोंचला यात नवल नाही. उत्कृष्ट ग्रंथाच्या कसोट्या षडलिंगे अर्थात उपक्रमोपसंहारो आभ्यासो पूर्वताफलं I अर्थवादोप पतीश्च लिंगं तात्पर्य निर्णयं II प्रत्येक अध्यायाला लावल्या तरी वाड्मय कसोटीला उतरणारा आहे. गुरु हा माणसाला जीवनयापनाचे किंवा जीवनात यशस्वी व सुखी होण्याचे मार्ग दाखवितो जीवनात समस्या, संकटे येतच असतात, त्यांच्या सोडवणुकीसाठी किंवा समस्येच्या निराकरणासाठी मानसिक बैठक कशी ठेवावी. शारीरिक प्रयत्न काय व कसे करावे. हे समजून सांगत असतो. गुरुचरीत्राचा ह्या दृष्टकोनातून विचार केला तर हा ग्रंथ ते काम ही उत्तम करतो. आपण मोठ्यातल्या मोठ्या ग्रंथाला “ग्रंथराज” म्हणतो. पंजाबी / शिख समाज मात्र “गुरुबाणी” ला गुरुग्रंथसाहिब” म्हणतात. त्या दृष्टीने ग्रंथ हाच “गुरु” ही अपेक्षा सुद्धा या “श्री गुरुचरित्र” ग्रंथाकडून पूर्ण होते. आणि यामुळेच हा ग्रंथ दैवत या पदवीला सहज प्राप्त होतो. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, उपपत्ती, तात्पर्य ह्या बाकी तर या ग्रंथात दिसतातच. पण अर्थवादही इथे आहे. “अर्थवाद” ह्या ग्रंथलक्षणातील महत्वाच्या लिंगाचा अर्थ सांगताना अर्थवाद म्हणजे “पोकळ शब्द” किंवा “खोटी स्तुती” असे एका ठिकाणी प्रतिपादन केले होते. त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक उदाहरणे ही दिली गेली. अर्थवाद म्हणजे निव्वळ खोटी ठरतील आणि सामान्य माणसाच्या भक्तीलाच तडा जाईल असा त्यावर मी आक्षेप घेतला तेंव्हा पूर्व मिमांसा शास्त्रात अर्थवाद हा तीन प्रकारचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यात गुणानुवाद ही आहे. त्यामुळे सर्वच फलश्रुती ह्या अर्थवाद नसतात. अशा फलश्रुती उदाहरणासहीत श्रीगुरुचरीत्रात यत्र तत्र सर्वत्र आढळतात.
श्री गुरुचरित्र हा ग्रंथ मुख्यत्वे श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरित्राचे वर्णन करणारा असला तरी मूळ अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे त्रोटक चरित्र कथन करणारा आहे,तसेच दत्तात्रेयांच्या अवताराबद्दल सांगताना मूळ पीठ किंवा मूळ उत्पत्ती आणि त्या निमित्त संपूर्ण सृष्टीचाच उद्भव कसा झाला याचेही वर्णन केले आहे. त्याबद्दलचा विचार संबधीत अध्यायाचे वेळी होईलच पण श्रीगुरुचरित्र हे केवळ गुरूंच्या गुणगानाचाच ग्रंथ नसून सृष्टीचा आरंभ कसा झाला येथपासून, सृष्टीतील घडामोडी, त्याचे जनजीवनावर होणारे परिणाम माणसांच्या जीवनात होणाऱ्या, असणाऱ्या, स्वकर्माने घडणाऱ्या बाबींचे यथा तथ्य ज्ञान, गुरूंची आवश्यकता, कर्तृत्व व महत्व, श्रद्धाभक्ती म्हणजे काय, कशी करावी, फळ काय असे सर्व अंगोपांगाचा परामर्ष घेणारा तो एक ज्ञानकोषच आहे. अज्ञानी ही ज्ञानी होतील असा विश्वास ह्या ग्रंथातच प्रगट करण्यात आला आहे.
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य सिद्धमुनी आणि नामधारक यांचा हा संवाद आहे, किंवा नामधारकाच्या प्रश्नांची उकल आहे. प्रश्नाला समर्पक सोदाहरण विस्तृत उत्तरे असे स्वरूप या ग्रंथाचे आहे. भावना जागृत ठेवून ग्रंथ वाचला तर रसाळ आहे, रटाळ नाही हे सहज पटेल. अनेकदा त्यातून निर्माण होणाऱ्या भाव रसाने, करुणेने, प्रेमाने, आनंदाने,कृपाळूपणाने डोळ्यात अश्रू दाटतात कधी कंठ अवरुद्ध होतो पुढची ओवी शब्द फुटत नाही. मी स्वत: हा अनुभव नित्यच घेत असतो.
गेले वर्षभर, “श्री गुरु चरित्रावर लिही” अशी सूचना मिळत होती. या आधी श्रीदत्तात्रेयाचे “नमस्काराष्टाक” , “ध्यान” व आरती माझ्याकडून लिहिल्या गेली आहे. आणखी काय लिहावे अशी चिंता लागली होती. पारायणे सुरूच होती पण विचारात अंधारच होता एक अक्षरही सुचत नव्हते. गुढी पाडव्याच्या १ आठवड्यापूर्वी मात्र सतत विचार घोळत होते. लिहिण्याची सूचना अजूनही सुरूच होती. आता ऊर्मीही येत होत्या. मग निश्चय केला की दत्त क्षेत्री जाऊन डोकं आणि चिंता दत्तचरणी वाहू, प्रसाद मिळाला तर परत येऊन कागद पेन घेऊ. त्यानुसार प्रथम “गुंज” येथे विचार केला योजना केली पण दोनदा बारगळली. नृसिंह वाडीचा विचार मात्र डोक्यात आला. लगेच तिसऱ्या दिवशी प्रत्यक्षात उतरला. वाडीला गेलो. दिवसभर उपवास सायंकाळी पोंचल्यावर दर्शन घेऊनच जेवण केले. विचार चक्रांना गती मिळाली. येतायेताच काय लिहावे किंवा कशी सुरुवात करावी याची शब्दरचना अंतर्मनात तयार झाली. आज प्रत्यक्षात करीत आहे.
यानंतर प्रत्येक अध्यायाच्या अनुषंगाने यथामती विचार मांडणार आहे . आणि दत्तचरणी अर्पण करणार आहे. आजचे हे प्रथम पुष्प “दत्तार्पणमस्तू”
क्रमशः