•गुरुचरित्र ||अध्याय पहिला||
*!! श्री गुरूदेव दत्त !!*
*श्री गुरुचरित्र अर्थ व बोध*
*अध्याय पहिला*
*मंगलाचरण*
श्री गुरुचरित्र ग्रंथ ज्ञानेश्वरी नंतर जवळ जवळ २५० वर्षांनी तयार झाला. त्या काळी म्हणजे १५ व्या शतकात मुस्लिमांची राजवट होती. त्यामुळे हिंदुधर्म, हिंदूंची मंदिरे यावर आक्रमणे झाली या राजवटीत श्री जनार्दन स्वामी देवगिरीच्या इस्लामी सत्तेमध्ये अधिकारी होते आणि श्री संत एकनाथांचे ते गुरु होते. हे दोघेही दत्तसंप्रदायी आणि त्यांचा समावेश राजकारभारात,अर्थात दत्तपंथावर व राजवटीवर एकमेकांचा प्रभाव असला पाहिजे. श्री गुरुचरित्रात यवनराजा व यवन राज्य याचा उल्लेख ही बाब स्पष्ट करते. अशा काळात समाजाला धर्मपर करणे परचक्रापासून रक्षण करणे तरीही दोन्ही समाजात समन्वय ठेवणे हे महत्कार्य दत्तावतारी सत्पुरुषांनी केले आहे.
त्यात पहिला अवतार "श्रीपाद श्रीवल्लभ" दुसरा "श्री नृसिह सरस्वती स्वामी" यांच्या कारकिर्दीचे वर्णन अध्याय ५ ते १० व ११ ते ५१ मध्ये अनुक्रमे आलेले आहे. व ५३ वा अध्याय सारांशाचा आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य सरस्वती गंगाधर साखरे हे "आपस्तंब" शाखेचे ब्राम्हण गाणगापूर जि गुलबर्गापासून जवळच कडगंजी नावाचे खेड्यातील रहिवाशी. त्याची नितांत भक्ती श्री महाराजांचे चरणी होती. यांच्याच वंशातील पूर्वज सायंदेव याचेपासून ५ व्या पिढीतील हे सरस्वती गंगाधर. संपूर्ण गुरुचरित्र हे यांनाच "सिद्ध" या शिष्याने सांगितले व तेच ग्रंथित केले अशी ग्रंथाची रचना आहे. ग्रंथ ओवीबद्ध असल्यामुळे त्यातील रचना ही एका विशिष्ट लयीत छंदात अनुप्रासात, यमकात केली आहे.
प्रथम अध्यायात मंगलाचरण आहे पण केवळ श्री गणेश वंदन करूनच भागवले नाही तर प्रत्येक अधिष्टित देवतांचे गुणगान आणि प्रार्थना आहे.
श्री गणेशाचे वंदन करीत असताना ओम नमोजी विघ्नहरा I गजानना गिरीजा कुमारा I जयजय लंबोदरा I एकदंता शूर्पकर्णा II असा गुणविशेषांचा उल्लेख केला आहे. कर्णयुगुले हलविल्यामुळे जो वारा उसळतो त्याच्या प्रतापाने विघ्ने उडून जातात म्हणजे तुझ्या प्रत्येक कृतीने भक्तांचे संकट हरण होते. तुझ्या नुसत्या असण्यानेही कार्य निर्विघ्न्न्न पार पडतात. सामान्य भक्तांचा तर त्राता आहेसच पण १४ विद्यांचा तू स्वामी असल्यामुळे वेदशास्त्र पुराणे यांच्या निर्मितीसाठी ब्रम्हादिकांनी सुद्धा तुझीच प्रार्थना केली आहे. १४ विद्या आणि ६४ कला असा सामासिक शब्द प्रयोग नेहमीच ऐकण्यात येतो मात्र श्री कृष्णांनी संदीपनी ऋषींकडे ६४ दिवस विद्या शिकली त्यात ६४ कला शिकल्या याचा उल्लेख भागवतात आढळतो. त्यात गीतम् , वाद्यम, चित्रकला, विशेषकच्छद्यम म्हणजे आधुनिक काळातील "ट्यटू" अंगावर तोंडावर रंगाने चित्र काढणे, तांदूळ,फुले,यांच्या रांगोळ्या असे विविध प्रकार आहेत. त्यात इंद्रजाल,कौचुमार म्हणजे शरीर संकोच करणे, अदृश्य होणे, टीका करणे ( ही सुद्धा कलाच बंद का!) वास्तुविद्या, रत्नपरीक्षा, स्थापत्यकला ह्यांना आज ज्ञान शाखा म्हणतात. इंजिनीयरिंग, आर्किटेक्टचर, जिमॉलॉजी अशी नावे त्यांना दिली आहेत, मात्र तिने सर्व कलाशाखेतच मोडतात. अक्षर मुष्टिका कथन असेही एका कलेचे नांव आहे.त्यात मुठीच्या हालचालीने संभाषण आहे. दूरदर्शनवर "डिफ अँड डम्ब" मूक बधिर साथीच्या बातमीपत्रात ही दिसते. याशिवाय वैनायिकी, वैजायिकी, वैतालिकी विद्याही आहेत. काहींना "विद्या" म्ह्टले तरी त्या कलाच आहेत. भागवतात किंवा श्री गणेश पुराणातही १४ विद्याबद्दल विस्तृत अशी माहिती आढळली नाही. वेदशास्त्र यांना विद्या म्हटले तर ४ वेद ६ शास्त्रे ही संख्या १० च होते.असो माझी माती कुंठित आहे पण शब्द प्रामाण्यावर श्रद्धा आहे तेव्हा १४ च विद्या आहेत. अशा या गण नायकाचे नमन करून ग्रंथकार श्री गुरुचरित्र ग्रंथ सिद्धीस नेण्याची विनंती करतो. बुद्धी आणि विद्या ह्या दोन्हीही बुद्धीदात्या गणेशाच्या अधिकारातील गोष्ट पण कथन करणे हे वाणीचे कार्य म्हणून वाणीची अधिष्ठात्री देवी ब्राम्हकुमारी सरस्वती तिलाही नमन करून गुणगान करणे आवश्यक आहे. त्या शारदेने जिव्हेवर वास करून ग्रंथ कथन करवून घ्यावा. तुझ्या साह्यावाचून वेदशास्त्रे वर्णन करणे अशक्य आहे. ही खरोखरीची वस्तुस्थिती आहे. वाणीच्या अभावाने एक शब्दही उच्चारता येत नाही. वाग्देवी "सरस्वती" आहे, स्तुती स्वामी नृसिंह "सरस्वतीची" आहे आणि कथन करणारा /पृच्छक "सरस्वती" गंगाधर आहे म्हणून "सरस्वती" या एकाच नामसूत्रात गुंफवून देवीने त्यांना आपलेच स्वस्वरुपी समजून ग्रंथ लिहून / कथवून घ्यावा त्यासाठी माझ्या जिव्हेला प्रेरणा द्यावी अशी विनंती केली आहे. नंतर जो सृष्टीचा कर्ता आहे आणि ज्याचा हुंकारचं वेद आहेत असे ब्रम्ह, जो या विश्वाचा नायक आहे आणि जो शरण आलेल्याला इच्छित देतो अशा विष्णूला व जो पाचमुखे व दहा हात धारण करणारा असून लय कर्ता आहे. अशा त्रिमूर्ती ब्रम्ह विष्णू महेशाला नमन आहे. मती आणि गती बुद्धी आणि वाणीसाठी प्रार्थना झाली परंतु ग्रंथ रचना पद्य रचना हे काव्यरूप आहे. तेव्हा कविकुळांना वाल्मिकी; व्यास; पराशर यांना विनंती करून काव्यव्युत्पत्ती कशी व्हावी याचे ज्ञान मागितले तसेच ग्रंथ कसा लिहावा म्हणजे ग्रंथ लक्षणे काय असावीत याची ज्ञान प्रार्थिले आहे. इतक्या श्रेष्ठांना वंदन करून नंतर माता पित्याला वंदन करून स्वतःचा परिचय दिला आहे. सायंदेव साखरे या आपस्तंब शाखेतील कौंडिण्य गोत्राच्या ब्राम्हण वंशांत नागनाथ देवराव गंगाधर व काश्यप गोत्रातील चौंडेश्वरची मुलगी चंपा यांचा पुत्र तुम्हास नमस्कार करतो अशी ओळख दिल्यानंतर श्री गुरूंना नमस्कार केला आहे. मातृदेवोभव, पितृदेवोभव नंतर आचार्य देवोभव या न्यायाने मातापित्याच्या नमनानंतर गुरुचे नमन केले बालपणी बोलणे चालणे लिहिणे वाचणे वैगेरे माताच शिकविते आणि हेच ज्ञान माणसाला जन्मभर साथ करीत असते. सामाजिक स्तरावर माणूस कुठेही पोचला तरी हा पाया त्याला विसरता येत नाही. लहानपणी मातेने ह्या गोष्टी शिकविल्या नाही तर पुढे अक्षर ओळख, भाषाज्ञान मोठमोठ्या पदव्या मिळविणे काहीच शक्य नसते. त्यामुळे माणसाने हे विसरूही नये. तो कृतघ्नपणा होईल. पुढे त्रैवर्णिकात उपनयन संस्कारात दुसरा गुरुपिता असतो. यापुढे विशेष अशा लौकिक साधनेसाठी किंवा पारलौकिक साधनेसाठी मार्गदर्शन करतो तो गुरु म्हणून तिसऱ्या क्रमांकावर श्री गुरुचे स्मरण व नमन केले आहे. नंतर संत,तापसी जे ज्ञानी आणि परम भक्त आहेत त्यांना नमस्कार केला आहे. आणि विनंती केली आहे की मी मूढ अज्ञानी असल्याने गुरुचे वर्णन हे लहान मुलाने बोबडे बोलल्याप्रमाणे होईल याची जाणीव आहे. तथापि श्री गुरूंच्या निरोपामुळे त्यांचे गुणगान करणार आहे. याची जाणीव आहे. तथापि श्री गुरुची प्रसन्नता आमच्या वंशात पूर्वपरंपरेने आहे आणि त्यांच्या आज्ञेने इच्छेनेच मी हा "अमृतघट" स्वीकारीत आहे. माझी शक्ती किंवा पात्रता नसली तरी गुरुची आज्ञा मोडणे हे महापातक आहे व शेवटी कर्ते करविते तेच आहेत म्हणून मी हा प्रयत्न करीत आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अनुवाद करणे हा जरी ईश्वरी संकेत असला तरी एवढे महत्कार्य करण्यापूर्वी,जनक, जननी, गुरु, कवी संत,तपस्वी अशा व्यक्ती विशेषांचे आशिर्वाद घेणे. त्या त्या महानुभावांना शरण जाणे हे केवळ लीनतेचे किंवा औपचारिकतेचे लक्षण नाही. ते विद्ववतेचेही लक्षण आहे. "विद्या विनयेन शोभते" हे इथे स्पष्ट होईल.
साहित्य साधनांची विपुलताच केवळ उपयोगी नाही तर त्याबरोबर सद्गुरू कृपेची नितांत आवश्यकता आहे. कुणाच्याही कृपेसाठी लीनता झुकणे-वाकणे नमन करणे आवश्यक आहे. आंब्याने डवरलेले झाड-फांद्या झुकलेल्या असतात तर काट्यांनी भरलेली बाभूळ ताठ असते हा लक्षणार्थ विचार करण्यासारखाच आहे. असो यथाधिकार सर्वत्रांना वंदन केल्यानंतर सरस्वती गंगाधरांनी चरित्र वर्णनास सुरुवात केली आहे. त्रैमूर्तीचा अवतार असलेले श्री नृसिह सरस्वती महाराजांचे चरित्र अपार आहे आणि त्याचे वर्णन कुणासाठी शक्य नाही. श्री नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापूर येथे असताना त्यांच्या अनेक मोहिमांमुळे त्यांची कीर्ती चोहोकडे पसरली. आसपासच्या ठिकाणची अनेक जण दर्शनाला येत त्यामुळे तिथे यात्रेचेच स्वरूप आले होते. अनेक जण गाणगापूर येथे राहून स्वामींची भक्ती करून आपापल्या इच्छा पूर्ण करून घेत होते. त्यावेळी "नामधारक" भक्त सुद्धा गुरुदर्शनाने धन्य होण्यासाठी धडपडत होता आणि पावलोपावली गुरुची स्तुती करीत दर्शनासाठी व्याकुळ होत होता. भक्ताने अनेक प्रकारे गुरुची विनवणी केली आहे. गुरुची त्रैमूर्ती I म्हणती वेदश्रुती I सांगती दृष्टांती कलियुगात I कलियुगात ख्याती I नृसिंह सरस्वती I भक्तासी सारथी कृपासिंधू I कृपासिंधू भक्ता .... अशी शब्द रचना अभंग छंदात केली आहे. त्याचबरोबर एका चरणाच्या शेवटी येणारा शब्द दुसऱ्या चरणाचा आरंभ असतो याला अनुप्रास अलंकार म्हणतात. अशी छंदोबद्ध रचनावाचताना लय लागतेच लागते. सद्गुरूंचा धावा करत असतांना गुरूंना अनेक उपमा अलंकारांनी संबोधिले आहे. तू त्रिमूर्ती आहेस आणि समस्त सृष्टीचा पालनकर्ता आहेस. म्हणून दाताही आहेस मग तुझ्याशिवाय ऐहिक काय किंवा दैविक काय कुणाला मागणी करावी. वेद पुराणात तुलासर्वज्ञ म्हणले आहे मग माझ्या मनाची तळमळ का समजत नाही. काही तरी दिल्यावरच तू देशील म्हणावे काय? मग बळीराजाने संपूर्ण राज्य तुम्हाला दिले त्याला मात्र तुम्ही पाताळात लोटले. देण्याचे असे विपरीत फळ! बिभीषणाला लंकेचे राज्य दिले बिभीषणाने पूर्वी कोणाला लंकादान दिली का? ध्रुवाला अढळ पद दिले त्याने तुम्हाला काही दिले होते का? तू विश्वाचा पोषक आहेस. लक्ष्मी तुझ्याच घरी नांदते आहे. अशा परिस्थितीत मी, अती सामान्याने तुम्हाला काय द्यायचे? आईच्या मांडीवर बाळ बसून भुकेने नुसते आ करते आई त्याला काय मागते? उलट त्याला दूध पाजून तृप्त करते. तू माता तू पिता आहेस मी तुम्हाला काय द्यावे. घेऊन देणे हा तर मोबदला झाला त्यात दातृत्व नसते. ज्याप्रमाणे ढग पाणी देतात आणि तळी विहिरी तुडुंब भरतात त्यांनी ढगाला काय दिलेले असते. वस्तू रूपात देणे ज्यांना शक्य नाही त्यांनी सेवा करावी असे समजले तर आमच्या वंशोवंशी तुझी सेवा केलेली आहे आणि बापाच्या सेवेमुळे पुत्रांचा प्रतिपाळ करणे हा लौकिक धर्म असताना आपले माझ्याकडे दुर्लक्ष का ! सेवकांकडे स्वामींची कृपादृष्टी असावी. यांचेशी कठीणपणाने वागू नये असा संकेत आहे. आई रागावली तर पित्याला सांगता येते पिता रागावला तर मातेला सांगता येते. इथे तुच माता तूच पिता आहेस. तू रागावलास तर आम्हाला कुणाचा आधार मिळेल. अशी दगडाला पाझर फोडणारी विनवणी ऐकून श्री गुरुनाथ प्रसन्न झाले. गुरु येताच नामधारका आहे. गुरु हे महतत्व आहे आणि दातृत्व हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अर्थात गुरु सदैव दाताच असतो आणि भक्ताच्या प्रेमाचा भाव फक्त तो पहात असतो. इथे मंगलाचरणाच्या अध्यायाची समाप्ती होते.
*II श्री दत्तात्रेयार्पणमस्तु II*