•गुरुचरित्र ||अध्याय सातवा||
*!! श्री गणेशाय नमः !!*
*!! श्री गुरूदेव दत्त !!*
*श्री गुरुचरित्र अर्थ व बोध*
*अध्याय सातवा*
*महाबळेश्वर महात्म्य*
मागील अध्यायीं गोकर्ण महिमा वर्णन केला आहे. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ तिथे गेले. या स्थानाचे महात्म्य समजले. पण याची साक्ष कुणाला आली. अनुभव कुणाला आला ते सांगा म्हणजे श्रद्धेला बळकटी येईल. सिद्धांत कठीणच असतात ते उदाहरणामुळे सोपे होतात. तसेच अनेक व्रते आहेत. त्याचेही कुणाकुणाला फळ मिळाले ते उदाहरणाने सांगितले किंवा कथेतून प्रगट झाले तर ते कुणीतरी सर्वमान्य, आदर्श व्यक्तींनी अनुभव घेतल्यामुळे ते दृढमूल होते. सगळ्यांना माहिती असलेल्या सत्यनारायण व्रताचेही तसेच आहे. व्रत करणे तसे श्री विष्णूची पूजा करणे यापेक्षा अधिक काय आहे? पण त्या पूजेमुळे काय घडले. पूजेचा संकल्प करून काय झाले. प्रसादाचा अव्हेर केल्यामुळे काय झाले याच्या वेगवेगळ्या कथा वाचणे, ऐकणे का महत्वाचे आहे. आता तर व्रत करणे म्हणजे कथा ऐकणे हा अंगभूत कार्यक्रम झाला आहे. ह्या कथा ऐकणे त्यामुळेच महत्वाचे आहे. व्रत करणाऱ्यांची निष्ठा दृढ व्हावी. ऐकणाऱ्यांची व्रत करण्याची इच्छा व्हावी. व्रताचा प्रसार व्हावा हा एक हेतू असतो. त्यामुळे महाबळेश्वर लिंग दर्शनामुळे कुणाला अनुभव आला ते सांगा.असा प्रश्न नामधारकाने सिद्धांना केला. सिद्धांनी विस्ताराने कथा सांगण्यास सुरुवात केली. पूर्वी इश्वाकुच्या वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. राजा विद्वान आणि शूर होता. एकदा तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला. तेथे एक महाभयंकर असा दैत्य होता राजाने त्याला आपल्या बाणांनी ठार केले. त्या दैत्याचा भाऊ आला. मरतेसमयी दैत्याने आपल्या भावाला सांगितले तू माझा भाऊ आहेस तर माझ्या हत्येचा तू बदला घे, त्यावेळी त्या भावाने दैत्याचे भयानक रूप टाकून लहान रूप घेतले. सामान्य माणूस झाला आणि राजापाशी जाऊन गोड बोलून त्याचे कडे सेवक म्हणून राहिला. असे अनेक दिवस जंगलात राजाबरोबर राहिल्यामुळे आणि सेवा केल्यामुळे तो राजाचा विश्वासू नोकर झाला. राजाने त्याला आपल्याबरोबर राजधानीत नेले. त्यातही तो आपल्या भावाच्या मृत्यूचा बदल घेण्याची संधी शोधत होता. एके दिवशी राजाचे पितृश्राद्ध होते. त्या दिवशी राजाने या दैत्यबंधुसेवकास विश्वासू म्हणून श्राद्धाच्या स्वयंपाकासाठी लागले ते पुरविण्यासाठी आज्ञा केली. त्याच्या मनातील कपट जागृत झाले. त्याने श्राद्धाच्या स्वयंपाकात मांस शिजवले आणि ब्राम्हणांना वाढले. वसिष्ठ ब्राम्हण ! श्राद्धाला नरमांस पाहून वसिष्ठ रागावले आणि शाप देण्यास सिद्ध झाले. राजाही कोपला माझी चूक नाही, तुम्ही मला शाप देता तर मी ही शाप देतो म्हणाला. राजाची पत्नी मध्ये पडून म्हणाली गुरूला शाप देण्यासारखे महत्पाप नाही. गुरु बोलतील ते वरदानच समजावे. त्यानेच शिष्याचे कल्याण होत असते. राजपत्नीने वसिष्ठानाही विनंती केली आणि शाप मुक्ती मागितली. हा राजा पुढे शाप भोगू लागला. त्याच काळात राजाच्या हातून आणखी ब्रम्हहत्या घडली. त्या ब्रम्हहत्येमुळे राजाला संतती होत नव्हती. त्याने राज्यातील - दरबारातील जाणकारांना - ज्योतिषांना ब्राम्हणांना त्यावर उपाय विचारला. त्यावेळी गौतम ऋषींनी राजाला सांगितले. अंधःकार घालवण्यासाठी ज्याप्रमाणे अग्नी आहे. चंद्र प्रकाश ही आहे. मात्र त्यांना सूर्यप्रकाशाची बरोबरी येत नाही. त्याचप्रमाणे अनेक तीर्थे असले तरी ब्रम्ह हत्येसारख्या पातकाच्या नाशासाठी एक गोकर्ण महाबळेश्वरचं आहे. कारण तेथे प्रत्यक्ष मृत्युंजय शंकराचा वास असतो. त्यामुळे सर्व देव देवता यक्ष किन्नर तेथे येऊन आपले मनोरथ प्राप्त करून घेतात असे हे गोकर्ण कृतयुगात पांढरे होते. त्रेतायुगात लोहित म्हणजे तांबडे होते. द्वापार युगात सोन्यासारखे पिवळे होते. आता कलियुगात मात्र काळे झाले आहे. या तीर्थाचे ठिकाणी व्यतिपात, संक्रांत महाप्रदोष अशा दिवशी पूजा करणे महत्भाग्य आहे. माघ कृष्ण चतुर्दशीचे दिवशी एकच बेलाचे पान वाहिले तरी अनंत पुण्य प्राप्त होते. असे राजाला सांगताच राजाने एखादी कथा सांगा असे गौतम ऋषींना विनंती केली. गौतमांनी एका शूद्रिणीची कथा सांगितली. तिची कथा सांगत असता तिला प्राप्त झालेले दारिद्र्य, अंधत्व, रोग-व्याधी तिच्यात पूर्वकर्माचे कसे दोष होते हे स्पष्ट केले आहे. ती याचना करीत असतांना ओरडून म्हणत होती की मी पूर्व जन्मी कुणाला अन्न दिले नाही. म्ह्णून माझी अन्नान दशा झाली आहे. तेव्हा आता तुम्ही थोडे तरी दान करा. माझ्यासारखी अवस्था तुमची न होवो. या माध्यमातून गोकर्ण महाबळेश्वर महिमा आणि माणसाच्या कृतकर्माचे फळ हे कसे भोगावे लागते हे सांगून माणसाला त्यापासून बोध घेऊन सदाचारी बनण्यास प्रवृत्त केले आहे. तो राजा नंतर गोकर्ण क्षेत्री जाऊन ब्रम्ह हत्येच्या शापापासून मुक्त झाला. इथे सातव्या अध्यायाची समाप्ती आहे.
*II श्री दत्तात्रेयार्पणमस्तु II*