•गुरुचरित्र ||अध्याय चवथा||
*!! श्री गुरूदेव दत्त !!*
*श्री गुरुचरित्र अर्थ व बोध*
*अध्याय चवथा*
*दत्तात्रेय-अवतार*
सिद्धांनी नामधारकास गुरु महिमा सांगताना विनोद झाल्याचा उल्लेख मागे तिसऱ्या अध्यायात केला. नामधारकाने काय विनोद झाला असा प्रतिप्रश्न सिद्धांना केला. सामान्यतः अलीकडे विनोद हा एक विडंबनाचा भाग आहे. किंवा विडंबन म्हणजेच विनोद असा अर्थ दृढ झाला आहे. मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत. ज्यांनी आपला मूळ अर्थ गमावलेला आहे. अती वापर, अस्थानी वापर साहित्याचे अचाट प्रयोग करणारे नव साहित्यिक हे त्याला कारणीभूत आहेत. आपल्या चालीरीती मधील सुद्धा अनेक गोष्टी सोयीने वापरून परंपरेचे रूप धारण करून बसल्या आहेत. आता पुढच्या पिढीत मात्र एखाद्या जाणत्याने त्यात बदल किंवा मूळ काय ते सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला "शास्त्रात रूढी-र्बलीयसी" हे ऐकावे लागते. असो विनोद म्हणजे ललित साहित्यातील एक शिष्ट अलंकार आहे. विनोद म्हणजे थोडी गंमत झाली. फसगत झाली अशा अर्थाने इथे सिद्धांनी विनोदाचा उल्लेख केला आहे. ब्रम्हा,विष्णू आणि महेश्वर हे तिनही देव अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिची पतिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी आले आणि त्यांचा तो प्रयत्न फसला म्हणून ती विनोद कथा आहे. इथेही नामधारकाच्या प्रश्नाला सिद्ध कथा सांगताना अत्री ऋषी पासून सुरुवात न करता अत्री संभवा पासून किंवा तोच कसा झाला इथून सांगतात. अत्री ऋषींच्या पूर्वजांपासून कथा सांगतात. पूर्वी आपो नारायणांना सृष्टिक्रमण्याची बुद्धी झाल्यामुळे त्यांनी हिरण्यगर्भ अंडनिर्मिले ते फुटून ब्रह्मांड झाले. ब्रम्हदेवाचे १ वर्ष त्याच अवस्थेत होते. त्या मानाने आपले ३६५ दिवसांचे वर्ष इंग्रजी तारखेने होते. तिथीनुसार चांद्रवर्षगणना ३५४ दिवसांचे होते. वैगेरे परंतु हे ब्रम्हवर्षाच्या मानाने एका सेंकदाचें बरोबर नाही. चारयुगे एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रम्ह दिवस तितकीच रात्र या मानाने महिना व वर्ष एवढ्या काळानंतर त्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली.
एक तुकडा त्याची पृथ्वी झाली. मग १४ भुवने निर्माण केली भू: भुव: स्व: मह: जन: तप: सत्य अशी सात वरची भुवने आणि अतल, वितल, सूतल, तलातल, रसातल, महातल, पाताल असे सात खालची भुवने, ही १४ भुवने निर्माण केली. आणि सृष्टी रचनेसाठी सात मानस पुत्रांची निर्मिती केली. लोकनियुक्त राजसत्तेच्या उतरंडीची असते, तशीच ही व्यवस्था आहे. विविधाधिकार समर्थपणे राबविण्यासाठी विविध कर्तव्ये उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी हे सूत्र कुठेही परिणामकारक आहे. तर या सात मानस पुत्रांची नावे अशी होती. मरीची,अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, क्रतु, वसिष्ठ या सातांमधील जो अत्री तेथून पुढे गरुपीठाचे निर्माण आहे . या अत्री ऋषींच्या पत्नीचे नांव अनसूया अनसूया म्हणजे जिच्याजवळ कसलीच असूया नाही ती. आपण मात्र बोली भाषेत तिची अनुसया करून टाकली. अनसूया म्हणजे सयीच्या सोबती असणारी अनुचर! किती मोठे विडंबन! ही अनसूया अत्यंत पतिव्रता धर्माने राहणारी होती. पतिसेवा हेच तिचे व्रत होते. पतीच्या कोणत्याही कार्यात तन मने करून सहभागी होणे पतीच्या विरुद्ध एकही वर्तन न करणे हेच पतिव्रत्याचे लक्षण आहे. अशीच वागणूक अनसूयेची असल्यामुळे तिला तिच्या कर्मनिष्ठेमध्ये सूर्याची उष्णता, अग्नीचे दाहकता, वायूची शीतलता आणि भूमीची उच्चनिचता कशाचाही अडसर येत नसे. कारण तिच्या मुखातून शापवाणी निघाली तर त्रिलोकही भस्म झाला असता. तिच्या ह्याच गुणामुळे स्वर्गातील देवदेवतांनाही आपआपल्या स्थान रक्षणाची चिंता लागली. कुणाचेही स्थान तिने मागितले तर ते मिळालेच असते. तथापि अनसूया पतिव्रता असल्यामुळे पति निरोपाशिवाय ती काहीच करणार नाही हाच विचार ब्रम्हा विष्णू महेशांना आला नाही. प्रत्यक्ष देवांना काही विचार न येणे अशक्य आहे पण कार्य घडायचे असेल तर कारणही असावे लागते. त्रिमुर्तीच्या अवतारासाठीच हे कारण दाखविले असावे ब्रम्हा, विष्णू महेशांनी तिचा व्रतभंग करण्याची तयारी केली, आणि अत्रिऋषीच्या आश्रमात आले, आणि म्हणाले हे अनसूये आम्ही अत्यंत दूरवरून इथे आलो आहोत. तुमच्या आश्रमात अतिथींना इच्छा भोजन देता हे ऐकले होते. त्यामुळेच आम्ही आलो आहो. अतिथी हा शब्द इथे आला. वर मी असा उल्लेख केला आहे की आपण वेगवेगळ्या कारणांनी अनेक शब्द निरस केले किंवा त्यांचे मूळ अर्थ गमावून बसलो आहोत. अतिथी असाच शब्द आहे. कोणत्याही सभा समारंभात आपण प्रमुख अतिथी असा उल्लेख फार आवर्जून करत असतो. पाहुणा असा हा खेडवळ शब्द उच्चारण्याऐवजी अतिथी फार सुसंस्कृत साहित्यिक शब्द म्हणून वापरल्या जातो. पण अतिथी म्हणजे अचानक आलेला या-तिथी. तिथी म्हणजे ठरलेली 'अ' या उपसर्गाने तिथे नाकारार्थ उत्पन्न होतो. अभाव उत्पन्न होतो. अर्थात अतिथी म्हणजे अनाहूत,अचानक न बोलावता आलेला या अर्थाने प्रमुख पाहुण्यांचा उपमर्दच होतो, पण तो वक्त्याला कळत नाही. पाहुण्यालाही कळत नाही. आणि हीच परंपरा चालू राहते. छापील निमत्रंण पत्रिकेत ही आग्रहाने प्रमुख अतिथी, अतिथी संपादक असे उल्लेख करताना आपण स्वतःच्या लेखनाचा गौरव मिरवीत असतो. असो अतिथींना विन्मुख न पाठवण्याचे व्रत असल्यामुळे आमच्या इच्छेप्रमाणे आपण आम्हाला भोजन द्याल असे ब्राह्मणरुपी त्रिदेवांनी सांगितले. वर असेही म्हणाले की आम्ही फार भुकेले आहोत. आंघोळी वैगेरे येतांना नदीवरच आटोपून आलो आहोत. ऋषींना येण्यास फार वेळ लागेल तेव्हा आम्हाला लवकरच वाढून द्या. ऋषी पत्नीने विचार केला आणि व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांना जेवण वाढले.
याचकांनी दुसरी अट घातली हे सती तू अत्यंत सुंदर आहेस. अशी कीर्ती आम्ही ऐकली आहे. तेव्हा आमच्या मनात असे आले आहे की तू आम्हाला विवस्त्र होऊन वाढावे म्हणजे तुझे रूप आणि गुण या दोहोंचा आस्वाद आम्हाला घेता येईल. ऋषी पत्नी चिंतेत पडली. अट मोडावी तर व्रतभंग होईल तो संतर्पणाचा. अट मानावी तर व्रतभंग होतो पातिव्रत्याच्या कारण पर पुरुषांपुढे विवस्त्र होणे हे पतिव्रतेचे लक्षण नाही आणि हे कळण्यासाठी कोणतेही शास्त्र पाहावे लागत नाही. व्रत पालन हे संयमीत वागणे आहे ते कठीणच असते. त्याचा भंग होईल किंवा त्याच्या पालनात अडथळ्याप्रमाणे प्रसंग येतच असतात. प्रत्येक वेळी ती सत्वपरीक्षाच असते असे नाही. मात्र त्यातून मार्ग काढूनही व्रत पाळणे हे अनेकदा बुद्धी कौशल्याचेच काम आहे. इथेही अशी अडचण आली असता सती अनसूयेने तिच्या बुद्धी कौशल्याने त्यावर मात केली आहे. तिने विचार केला माझे मन स्वच्छ आहे. माझ्या पतीच्या तपश्चर्येचे सामर्थ्य माझ्या पाठीशी आहे. शिवाय भोजन देत असतांना कोणतीही स्त्री ही मातृरूप असते. भर्तृहरीने पत्नीचे लक्षण वर्णन करतांना "भोज्येषु माता" असेच म्हटले आहे. भोजन वाढतांना पत्नी मातेसारखी असते हा विचार करून माता असते हा विचार करून अनसूयेने वाढायला सुरुवात केली आणि तीनही देव बाळ रूप झाले. ही संकल्पसिद्धी आहे. अशारितीने तीन बाळे आश्रमात पाहिल्यावर अत्री ऋषींनी विचारणा केली पण अंतर्ज्ञानाने अर्थात मनोमन जाणले की हे त्रिमूर्ती आहेत. त्या बालकांचे भरणं पोषण अनसूया मातेने केले. नंतर ब्रम्हदेव हे चंद्ररूप झाले. ईश्वर दुर्वास ऋषी झाले आणि श्री विष्णू हे दत्तरूप होऊन आश्रमात राहिले. ही दत्तमूर्ती दत्तात्रेय नावानेच प्रसिद्ध झाली.हे मूळ पीठ आहे, इथूनच पुढे दत्तपरंपरा निर्माण झाली. नामधारक सिद्धमुनींना वंदन करून म्हणाले दत्तात्रेयाचे हे मूळपीठ आहे. तेथून पुढे अवतार परंपरा कशी झाली ते मला सांगा.
दत्तात्रेयांचा हा पहिला अवतार आहे. या अवतारातील कार्य या पुढील अध्यायात वर्णन केले आहे. अध्याय चौथा इथे समाप्त झाला.
*II श्री दत्तात्रेयार्पणमस्तु II*