•गुरुचरित्र ||अध्याय अकरावा||



*!! श्री गणेशाय नमः !!*
*!! श्री गुरूदेव दत्त !!*
*श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध*
*अध्याय अकरावा*
*नृसिंह सरस्वती अवतार*

श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतार समाप्ती केल्यानंतर त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या दृष्टांताची वर्णने मागील अध्यायात आली. पुढे अवतार परंपरा सांगण्याविषयी नामधारकांनी विनंती केल्यावर सिद्ध म्हणाले, एका विप्रस्त्रीची कथा तुला सांगितली होती. तिला शनि प्रदोष व्रत कर म्हणजे तुझ्या पोटी जगदवंद्य पुत्र जन्म घेईल असे वरदान दिले होते. त्या विप्रस्त्रीने त्याप्रमाणे गुरु उपदेशानुसार व्रत केले आणि मनात वासना असतांना ती पंचत्व पावली. इथेही गुरुवाक्य निष्ठेने पाळणे किती महत्वाचे आहे हे दिसते. आपल्या पोटी आदरणीय होणार पुत्र येणार. या गुरुवाक्याचा विश्वास ठेवून तिने आजन्म प्रदोषव्रत केले, पुत्र होणे एका विशिष्ट वयातच शक्य आहे. हे कुणालाही कळते पण ते वय उलटल्यावर पुत्र प्राप्ती शक्य नाही असे आपल्याच बुद्धीने निर्णय करून व्रत सोडणे. हे गुरूवर अविश्वास दाखवणे आहे. त्यातून गुरुनिष्ठेचे पोकळपण स्पष्ट होते. गुरु त्रिकालज्ञ असतात किंवा "गुरुवाक्य आपणा कारण", सत्य करणे ही गुरूंची जबाबदारी असा ठाम निश्चय माणसाला फळ मिळवून देत असतो. अशी भावना ठेवून देह असेपर्यंत गुर्वाज्ञा पालन करावी लागते. "को कालो फलदायक;" असे शास्त्र आहे. फळ कधी मिळणार हे आपण सांगू शकत नाही. अशी निष्ठा जपणाऱ्या त्या विप्रस्त्रीचा जन्म उत्तरेकडे करंजनगर म्हणजे सध्याच्या "कारंजा" या भारताच्या उत्तर भागात असलेल्या गावी झाला. वाजसनेय शाखेच्या एका ब्राम्हणाचे घरी अंबा या नावाने जन्म घेतला. पुढे योग्य वयात तिचा विवाह कारंजातच राहणाऱ्या माधव नावाच्या ब्राम्हणांशी झाला. योगायोग पहा तो ब्राम्हण सुद्धा शिवपुजकच होता. दोघेही शिवपूजन मनोमन करीत असताना तिला गर्भधारणा झाली. नऊ महिनेपर्यंत तिचे कोड कौतुक डोहाळे झाले, अक्षय वाणे झाले.
एके दिवशी ती प्रसूत झाली आणि एक सुंदर पुत्र जन्मला, अर्थातच सर्वत्र आनंदी आनंद झाला. पहिलाच पुत्र झाला म्हणून माता-पिता निश्चिंत झाली. आजही ह्या मानसिकतेत फारसा फरक पडलेला नाही. असो. त्या बालकाने जन्म झाल्याबरोबर ट्याहाँ, ट्याहाँ असा रुदनाचा आवाज करण्याऐवजी ओमकार उच्चारला. सर्व लोक विस्मित झाले. विद्वान ब्राम्हणांना ज्योतिषांना बोलावून माधवाने जातकर्म केले. हा संस्कार लुप्तप्राय आहे. षोडश संस्कारातील हा एक संस्कार आहे. हा संस्कार केल्यानंतर ज्योतिषांकडून जन्म लग्नादिकांची माहिती जाणून घ्यावी. काही अशुभ योग, दोष असतील तर त्यानिमित्त जप दानादी कृत्ये करावी असा विधी आहे त्यानुसार त्या माधव ब्राम्हणाने संस्कार केला. ज्योतिषांनी सांगितले हा मुलगा मोठा तपस्वी , ऋषी होईल. जगद्गुरू तर होईलच पण यांचा अनुग्रह ज्याला होईल तो ही सर्वाना वंद्य होईल. याला सर्व प्रकारच्या सिद्धी येतील. अवतारी पुरुषात याची गणना होईल मात्र हा गृहस्थाश्रमी होणार नाही, माधव आणि अंबा यांचा आनंद गगनात मावेना. सर्वांना त्यांनी वस्त्रे, दक्षिणा, भूषणे देऊन संतुष्ट केले. आपल्या आनंदाचा अशाप्रकारे महोत्सव करण्याची ह्या काळात मात्र पद्धत बुडाली आहे. आजही उत्तम ज्योतिषी आहेत. त्यांनी सांगितलेले भविष्य अचूक असे अनेकांना अनेक वेळा अनुभवही आले आहे. पण आनंदाने त्या ज्योतिषाचा सन्मान करणे मात्र नसते. भविष्य विचरतानाच त्याचा मोबदला दिला आहे अशी भावना लोकांची असते. मिनिटावर किंवा प्रश्नावर फीस आकारात असलेल्या व्यवसायिक ज्योतिषांमुळे ही भावना दृढमूल होणे शक्य आहे. पण आजही पारंपारिक पद्धतीने दक्षिणेवर संतुष्ट असणाऱ्या ज्योतिषांनाही त्याचा कटू अनुभव येतो. असो लोकाश्रयच तो !
जन्मल्याबरोबर ओंकाराचा उच्चार ब्राम्हण समुदायाने त्या बालकाचे वर्तविलेले भविष्य यामुळे मातापिता आनंदली तशी धास्तावली सुद्धा ! त्यामुळे त्याची दृष्ट काढणे, काळा गंडा बांधणे, अंगारा लावणे, असे करू लागली. अवतारी पूरुषाला या उपाधी होणे शक्य नसते, तरीही लौकिक धर्म सांभाळावा लागतो. त्यामुळे त्या बालकास फार काळ लोकांपुढे येऊ देत नसत. नंतर त्याचे नामकरण झाले. जन्मनाव शालिग्राम ठेवले व व्यवहारिक नाव नरहरी ठेवले. आजचे "अवकहडा चक्र" पूर्वी "अवकहोराचक्र" होते पण त्यातही नक्षत्र नामाच्या आद्यक्षरात श किंवा शा अक्षर नाही. उच्चार साधर्म्यानुसार 'सा' चा 'शा' केला असेल तर शततारका नक्षत्र व कुंभ रास सिद्ध होते. ही रास परिपूर्ण ज्ञानाची वैचारिक गांभीर्याची व प्रपंच किंवा ऐहीकतेच्या दृष्टीने उदासीन विचाराची व पारमार्थिक व अध्यात्मिक गुणांचा परिपोष असलेली ही रास आहे. या राशीवर तपस्वी, संन्यासी योगी जन्माला येत असतात. अर्थात नृसिंह सरस्वती स्वामींची रास कुंभ असली पाहिजे. अशा या सद्गुणी बालकांवर आई-बापाचे ममत्व जास्तच होते. त्याला अंगावरचे दूध पुरत नाही, त्यासाठी काही सोय करा म्हणताच तोच त्या बालकाने मातेला स्पर्श केला आणि तिला भरपूर दूध येऊ लागले. अर्थात माझ्या सहचर्यात कुणाला कसलीच चिंता करण्याचे कारण नाही हेच जणू स्वामींनी सुचविले असावे, तसेच परिसाप्रमाणे मी अमृत दृष्टीने लोखंडास स्पर्श केला तर तेही सुवर्ण होईल हा ही चमत्कार करून दाखवून माता-पित्यांना धन-धान्य-संपत्तीची चिंता न करण्याचे सुचविले आहे. आतापर्यंत हा बालक सामान्य नाही याची माता-पित्यांना खात्री पटलीच होती. पण तरीही आईला बाळाने बाळासारखे असण्याचे अप्रूप असते. तिला कितीही कष्ट पडले. तरी बालकाने पूर्णतः मातेवर विसंबून असण्याचे मानसिक सुख अवर्णनीयच आहे. त्याच्याबरोबर तिला सुद्धा बालपणात शिरता येते. आपल्या बालपणाचा पट पुन्हा उघडून पाहता येतो. या आनंदाला वर्णन करण्यास शब्दच नसतात. लग्नाचे २५ वे वाढदिवसाची दिवशी लग्नाचा फोटो अल्बम काढून पाहतानाच आनंद त्या जोडप्याच्या चेहऱ्यावरचं पाहावा लागतो. माता अंबा त्या बालकाला म्हणते अरे बाळा तुला सर्व समजते ऐकू येते कळते मग बोलत का नाहीस. तुझ्या बोबड्या बोलाने घर आनंदून गेले असते. मातेचे बोलणे ऐकून बाळ मौंजी बंधनाची खून करतो. लगेच बाळाच्या मौंजी बंधनाची तयारी सुरु होते मोठे मोठे विद्वान ब्राम्हण, ज्योतिषी बोलावून मुहूर्त काढण्यात येतो. काही कुबुद्धी म्हणू लागले बाळ मुका आहे, त्याच्या मुंजीसाठी एवढा खर्च कशाला? पूढे त्याला गायत्री उपदेश कसा करणार? कुणी म्हणाले आपल्याला दान दक्षिणा मिळेल ना ! कशाला पंचाईत करायची ! अनेकांच्या अनेक बुध्दितऱ्हा दुसरे काय. आज ही मौंजीबंधन हा थाटामाटाचा मिरवण्याचा आणि देण्याघेण्याचाच सोहळा झाला आहे. किती बटू त्यानंतर रोज संध्या करतात. विचार केला तर विदारक चित्र दिसेल. इथे या बाळाचे तसे नाही. "गायत्री प्रबोध" हाच "मतिप्रबोध" आहे हे त्यांना जनमानसात ठसवावयाचे होते. मुकं करोति वाचालं" हे असे आहे. मुहूर्तानुसार देव प्रतिष्ठा झाली. चौल कर्म झाले. पुन्हा अभ्यंग स्नान झाल्यावर यज्ञोपवीत धारण विधी संपन्न झाला. मग पित्याने गायत्री मंत्राचा उपदेश केला. बालकाने मंत्र मनोमनच जपला. सर्वासमक्ष मोठ्याने उच्चार केला नाही. परमेश्वरी अवतारात प्रत्येक कृती ही शास्त्रपूत असते आदर्शच असते. गायत्री मंत्र हा गुप्तपणे उच्चारणे महत्वाचे आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा चार प्रकारच्या वाचा आहेत. क्रमाक्रमाने त्या कनिष्ठ आहेत म्हणून वैखरी म्हणजे उघड वाचा ह्या कनिष्ठ प्रकारे गायत्री मंत्राचा उच्चार न करता गौप्य होऊन केला. आज गायत्री मंत्राची ध्वनी फीत कर्कश आवाजात वाजते आहे. ती सुद्धा एका स्त्रीच्या आवाजात मंत्रशास्त्रात याचा निषेध सांगितला आहे. मात्र म्हणावयचा आहे, पण त्याचे शास्त्र, त्याचे निर्बंध पाळायचे नाहीत. अशी एक विद्रोही उदंड वृत्ती अलीकडे फारच उफाळून आली आहे. वस्तुतः प्रत्येक कृतीला प्रत्येक कार्याला ज्याचे त्याचे नियम आहेत, आगगाडीस प्रवास करावयाचा आहे पण तिकीट नको असे चालेल का? भाकरी करायची आहे पण हाताला चटका नको! शक्य आहे काय? बहीणबाईला विचारा. तेव्हा मंत्र म्हणावयाचा आहे त्याचे नियम आहेत त्याचे फळही आहे. फळ मिळेल नियम सांभाळा. गायत्री मंत्रासंबंधी बालपणीच स्वामींनी वस्तुपाठ दिला - मनातच जप करा. मंत्र या शब्दाची व्युत्पत्तीही "मननात त्रायते" अशीच आहे. मंत्रोपदेश झाल्यावर. माता भिक्षा घेऊन आली. आता मात्र ओं भवती उच्चारण्याची वेळ आली. तेव्हा प्रथम भिक्षेच्या वेळीच ओं अग्निमिळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्त्विज I होतारं रत्नम धातम I अशी ऋग्वेदाची प्रथम ऋचा म्हणून ओं भवती भिक्षा देही ओं स्वस्ती असा उच्चार केला. दुसऱ्या भिक्षेच्या वेळी इशेत्त्विर्जेतवॊवायस्थहो पायवस्थ देवोव: सविता प्रपर्यतू श्रेष्ठतमाय कर्मने I असा यजुर्वेदाचा उच्चार केला. तिसऱ्या भिक्षेला I अग्नआय हीवितये गृनानो हव्य दातये I नि होता सर्त्सि बर्हिनी असे समगायन केले. चौथा वेळी I शननो देवी रभीर्षय आपो भवन्तु पितये I शयोरभीस्मवांतुन: I असा अथर्व वेदाचा उच्चार केला.
आजपर्यंत म्हणजे मौंज होईपर्यंत मुका असलेला मुलगा गायत्री उपदेश होताच चार वेद मुखोदगत म्हणू लागला हा गायत्रीचा प्रभाव आहे. हे तर स्वामींना सांगायचे नसेल ! मौंजीला आलेले सर्वजण तटस्थ झाले आणि हा जगद्गुरुंचाच अवतार आहे हे जाणून नमस्कार करू लागले. इतक्यात मातेला ते बालक म्हणाले माते तु आम्हाला भिक्षा माग म्हणालीस आता तुझा शब्द राखणे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे आता मला निरोप दे .तीर्थाटन करून भिक्षा मागून वेदाभ्यास करीन. बालकाचे बोलणे ऐकून माता रडू लागली. बाळा आजपर्यंत मुका होऊन राहिलास आता तुला वाचा आली तु ज्ञानी झालास आतातरी तू म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आशा वाटत होती. पण तू तर संन्यासाच्या गोष्टी करतोस. मातेचे म्हणणे एकूण घेऊन ते बालक म्हणाले दुःख नको करू माते माझा जन्मच जगदुध्दारासाठी झाला आहे. तथापि तुला मात्र आणखी चार पुत्र व एक कन्या होईल. पुत्र तुमची सेवा परोपरी करतील असे म्हणून मातेच्या डोक्यावर हात ठेवला. तोच मातेला पूर्वजन्मीचा इतिवृत्तांत आठवला आपण श्रीपाद श्रीवल्लभांना मध्यान काली भिक्षा दिली होती. त्यांनी तुझ्या पोटी विश्ववंद्य पुत्र होईल असा आशिर्वाद दिला होता ते आठवले आणि हे बालक म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार आहे हे जाणून मातापित्याने नमस्कार केला. असे असले तरी माता म्हणाली धर्म शात्रानुसार चारी आश्रम आचरण करून नंतर संन्यास घ्यावा . बालवयात संन्यास घेणे व्यर्थ आहे. सर्व इंद्रिय जय अधिकरावा लागतो. नंतरच संन्यास फळतो. मनाच्या इच्छा आकांक्षा पुरवल्या नाहीत तर ते सर्व मोक्ष मार्गाच्या वाटेत अडथळे करतात. मातेचे बोल ऐकून बालक मातेला ज्ञान सांगू लागले. इथे अकराव्या अध्यायाची समाप्ती आहे.

*II श्री दत्तात्रेयार्पणमस्तु II*