• गुरुचरित्र ||अध्याय दहावा||

*!! श्री गणेशाय नमः !!*
*!! श्री गुरूदेव दत्त !!*
*श्री गुरुचरित्र अर्थ व बोध*
*अध्याय दहावा*
*श्रीपाद लीला*

कुरवपुरात श्रीपाद श्रीवल्लभ अजूनही आहेत अशी लोकांची श्रद्धा होती. नामधारक म्हणतात जर श्रीपाद अजूनही कुरवपुरातच आहेत तर मग त्यांच्या अस्तित्वाची जाणीव कुणाला झाली पुढे अवतार कोणता झाला ते सांगा, सिद्ध म्हणाले ठीक आहे. तुझ्या प्रश्नामुळे मला सहजच गुरुभक्ती घडत आहे. गुरुमहिमांचे वर्णन करणे, गुरूंच्या लिलांचे चरित्र लिहिणे, श्रद्धा करणे यामुळे भक्ती दृढ तर होते आणि भक्ती दृढ होणे म्हणजेच प्रसन्नता लाभणे होय. तुझ्यामुळे मला ते सहज घडत आहे. काय आहे ! माणसाचे मन हे अतिशय चंचल आहे. एका सुभाषितकाराने 'मकाराने सुरु होणारे दहा प्रकार वर्णिले आहेत. मन, मधुकर, म्हणजे भुंगा, मेघो, मद्यपी, मत्कुण म्हणजे ढेकूण,मरुत-वारा, मर्कट. हे "म" पासून सुरु होणारे चंचल आहेत. क्षणात ती त्यांची जागा बदलतात. त्यांना बळेच बंधक बनवावे लागते. इतरांचे सोडा मुक्ती अपेक्षा त्यांना असू शकत नाही. ते सर्व भोगयोनीतील आहेत. पण माणूस! त्याला विवेक आहे, ज्ञान आहे. त्याच्या साहाय्याने तो आत्मोन्नती करून घेऊ शकतो. त्यामुळे मनाला एखाद्या विषयाची आठवण करून द्यावी लागते. वळण लावावे लागते. मग कथेमध्ये मन रमणे लवकर शक्य असते. म्हणून चरित्राचे श्रवण करावे. सिद्ध सांगू लागले त्या गुरूंचा महिमा काय सांगावा. तो विश्वव्यापक आहे. वेगवेगळ्या कारणासाठी त्याचेच अवतार होतात. गीतेमध्ये याचे सर्वव्यापक रूप सांगितले आहे. ईश्वर अंशी आहे. सर्व जड चेतन त्याचे अंश आहेत. त्या दृष्टीने सर्व अवतारच आहेत. असे म्हणणेही अतिशयोक्त होणार नाही. या विविध विशिष्ट कार्याकारणाने झालेल्या अवतारात परशुरामासारखाही अवतार चिरंजीव आहे. भक्तांच्या रक्षणासाठीच भगवंताला अवतार घ्यावे लागतात.
अशा त्रिमूर्तीचे अवतारांचा महिमा वर्णन करणे अशक्यच आहे. श्री गुरु जिथे वसतात ते स्थान सुद्धा सुद्धा सिद्ध स्थान होत असते. कुरवपूर हे अत्यंत पवित्र व जागृत स्थान झाले. श्री गुरूच्या गुप्त होण्यानंतर एकदा असे घडले की कुरवपुरच्या जवळच एक द्विज आचारसंपन्न आणि स्वकर्मप्रविण होता. आपला व्यवहार काटेकोरपणे करून उदरनिर्वाह करीत असे. कुरवपूरच्या यात्रेत दरवर्षी येण्याचा त्याचा नियम होता. एकदा त्याने विचार केला या वर्षी जर अधिक लाभ झाला तर कुरवपूरच्या यात्रेत एक हजार ब्राम्हणांना इच्छाभोजन देईन. नियम पाळण्याचा आणि निश्चयाने पाळण्याचा काही एक लाभ होत असतो. पैठणच्या एका व्यापाराची गोष्ट आहे. त्याचा व्यापार प्रचंड प्रमाणात चालत होता. त्याला जेवायचीही फुरसत मिळत नव्हती. नाथांना त्याच्यावर कृपा करण्याची इच्छा झाली ते त्याला म्हणाले दिवसातून एकवेळ तरी त्या ईश्वराला स्मरत जा ज्याने तुला एवढे ऐश्वर्य दिले आहे. तो म्हणाला महाराज मला तुमच्याशी बोलायलाही वेळ नाही. नाथांबद्दल त्याला आदर होता. पण काय करतो बिचारा! नाथ दुसरे दिवशी त्याच्या स्नानाच्या वेळी गेले. तो व्यापारी स्नान करण्याच्या पद्धतीने स्नान करत होता. जी काही १०-१५ मिनिटे लागायची ती त्याने घेतली. झाले नाथांनी हे हेरले त्याला म्हणाले स्नानाची १५ मिनिटे तुला मिळतात ना तो म्हणाला हो! मग तुला देवाच्या स्तुतीपर काही येते का? तो म्हणाला लहानपणी वडिलांनी विष्णुसहस्त्रनाम शिकवले ते पाठ आहे. नाथ म्हणाले उद्या पासून पहिला तांब्या डोक्यावरून घेतला की विष्णुसहस्त्रनाम म्हणत जा. त्या दिवशीपासून व्यापाराला एक नित्यक्रम सुरु झाला. स्नानाला सुरुवात झाली की विष्णुसहस्त्रनाम सुरु अनेक वर्षे असे अव्याहत चालले. एके दिवशी कालक्रमाने मृत्यू आला. सर्वत्र शोकमय वातावरण झाले. त्याची शेवटच्या यात्रेची तयारी झाली आणि त्याच्या मुलाने शेवटचे स्नान घालतांना डोक्यावर तांब्या ओतला की काय आश्चर्य त्या व्यापाऱ्याच्या तोंडातून " विश्व विष्णूर्वषटकारो" सुरु झाले. त्याचे गंडांतर टळले. हा विष्णू सहस्त्र नामाचाच परिणाम आहे. किंवा नित्यनियमाचा परिणाम आहे. काय आहे? याचा विचार विचारवंतांना करू द्या. चिकित्सकांना विश्लेषण करू द्या. नास्तिकांना टर उडू द्या. पण नित्यनेमाचा काहीतरी परिणाम असतोच. "लागले वळण इंद्रिया केवळ" अशी अवस्था तोटेच. समोरच्या रुग्णांशी बोलत बोलत डॉक्टर औषधांची यादी करतो, अधिकारी इतरांना सूचना देत देत फाईलीवर सह्या करतो, की-बोर्ड न बघता माणूस टाईप करतो. अशी अनेक उदाहरणे देता पार्टीला. मुद्दा असा आहे. नियमांचा आणि निश्चयांचा फायदा होतोच. त्यानुसार त्या कुरवपूरच्या गृहस्थासही त्यावर्षी अमाप फायदा झाला आणि ठरविल्याप्रमाणे तो सहस्त्र भोजनासाठी पैसे घेऊन कुरवपुरकडे निघाला. त्याच्या सोबत दोघे-तिघेही जण होते. ते ही कुरवपुरालाच चालले. म्हणाले, त्यांनी त्या ब्राम्हणजवळील द्रव्य पाहिले होते. जाता जाता रस्त्यात रात्रीचे वेळी त्या चोरांनी द्विजाला मारून त्याचे द्रव्य हरण केले. या द्विजाची तल्लीनता गुरुचरणी असल्यामुळे त्याचे रक्षण करण्यासाठी श्रीपाद योगी तिथे तात्काळ प्रगट झाले व आपल्या हातातील त्रिशुळाने त्या चोरांचे पारिपत्य केले. त्यातील एक जण येऊन श्रीपादांना हात जोडून म्हणाला. स्वामी माझ्या मनाची वासना आपण जाणताच मी निरपराधी आहे . मला त्या चोराबद्दल काहीच माहित नाही. त्याचा शुद्ध भाव ओळखून त्याच्या हस्ते मृत द्विजाचे अंगावर विभूतींचे प्रोक्षण केले आणि त्याला उठविले व अदृष्य झाले. थोड्या वेळाने सूर्योदय झाला आणि त्या द्विजाला सर्व वृत्तांत कळाला. त्याला आनंद झाला श्रीपाद अजूनही कुरवपुरातच असल्याची साक्ष पटली. पुढे तो कुरवपुरास गेला. ब्राम्हण भोजन घातले. असे दृष्टांत भाविक भक्तास होत होते. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना पुढे अवतार घ्यावयाचा होता. काही दिवस गुप्त रूपाने लीला केल्यानंतर पुन्हा नृसिह सरस्वती या नावाने त्यांचे प्रगटीकरण झाले. श्री गुरुचरित्राच्या आरंभालाच नृसिंह सरस्वती स्वामी नामधारकाला भेटल्याचा उल्लेख आला आहे. नृसिंह सरस्वती स्वामीचाच हा ग्रंथ असल्यामुळे तिथेच सुरुवात आहे. नामधारकाच्या विविध प्रश्नांना उत्तरे देतांना श्री गुरूंचे मूळपीठ सांगण्याच्या हेतूने श्री दत्तावतार म्हणजे दत्तात्रेय अवतार त्या अनुषंगिक कथाप्रसंग नंतर श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार व अवतार कार्य याचा वृत्तांत आला आहे. त्यानंतर आता क्रमाने नृसिंह सरस्वतीचाच अवतार होणार आहे व त्यांचेच चरित्र वर्णन येणार आहे. प्रथमतः वाचकाला अध्यायाच्या ओघात संदर्भ लक्षात येत नाहीत. याचकांच्या ते विस्मृतीत जाते आणि पुन्हा नृसिंह सरस्वतीचाच अवतार होणार म्हटले की सामान्यांचा घोटाळा होतो. हा थोडा पश्चात स्मृतिचित्रांचा ( फ्लॅशबॅक ) प्रकार समजण्यास हरकत नाही. असो, इथे दहाव्या अध्यायाची समाप्ती आहे.

*II श्री दत्तात्रेयार्पणमस्तु II*