•गुरुचरित्र ||अध्याय पाचवा||
*!! श्री गणेशाय नमः !!*
*!! श्री गुरूदेव दत्त !!*
*श्री गुरुचरित्र अर्थ व बोध*
*अध्याय पाचवा*
*श्रीपाद-अवतार*
ऋषी दुर्वासांनी अंबरीशाला मृत्युलोकात दहा अवतार घेशील असा शाप दिला तो श्री विष्णूंनी स्वतःवर घेतला हे आपण यापूर्वीच्या कथाभागात पाहिले. त्या अवतारात मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध(नग्नावतार) त्यापुढे कलियुगात कलंकी अवतार होणार आहे. श्रीमद भागवतात २४ अवतारांचा उल्लेख आहे. वर आलेल्या दशावतारात श्रीराम श्रीकृष्ण आठवे, नववे असले तरी भागवातानुसार ते अठरावे व एकोणीसावे आहेत. तसेच वर आलेला बौद्ध रुपी अवतार ही प्रचलित समजुतीनुसार किंवा उगाच केलेल्या मतांच्या प्रक्षेपानुसार "बुद्ध" अवतार नसून बिहार राज्यात "अजना"च्या पोटी पुत्र होऊन हा बुद्धावतार होणार आहे. देवदेवतांचा द्वेष करणाऱ्यांना मोहित करण्यासाठी हा अवतार होणार आहे. कलियुगाच्या प्रादुर्भावानंतर हा अवतार होणार आहे. असे भागवतात वर्णित आहे. सध्या कलियुगाची ५१०० वर्षे संपली आहेत. आणि ४ लक्ष २६०० वर्षे शिल्लक आहेत. या दृष्टीने कलियुगाची सुरुवात मध्य आणि शेवट असे तीन कालखंड केले तर एकलक्ष ४४ हजार वर्षांचा एक कालखंड होतो, म्हणजे १४४००० वर्षात कधीही हा अवतार होऊ शकतो त्यामुळे झालेला बुद्धावतार हा फक्त नामसदृष्य आहे इतकेच ! त्यानंतर २८८००० वर्षे समस्यांवर उरलेल्या १४४००० वर्षाच्या कलियुग काळात कल्की किंवा कलंकी हा घोड्यावर बसलेला अवतार होणार आहे. प्रत्येक अवतारात भगवंतांनी लोककल्याण, लोकरक्षण, दुष्ट प्रवृतींचा नाश अशीच कार्ये केली आहेत. किंबहुना भगवंताचा अवतार हा याचसाठी होत असतो. परित्राणाय साधुनां I विनाशयच दुष्कृताम I धर्मसंस्थापनार्थाय I संभवामी युगे युगे I हे तेच आश्वासन गीतेमध्ये सांगितले आहे.
याच प्रमाणे श्री दत्त्तात्रेयांनीही अवतार धारण केले आहेत. पिठापूर नावाचे एक गाव भारताच्या पूर्वेकडे म्हणजे आंध्रात आहे. तेथे आपस्तंब कुळात आपळराजा नावाच्या ब्राम्हणाचे पोटी श्री दत्तात्रेयांचा पुढील अवतार झाल्याची कथा आहे. आपळराजा आणि सुमती हे ब्राम्हण कटुंब स्वधर्माचार सांभाळून राहात होते, ब्राम्हण यजन याजन करून प्रपंच चालवीत होता, तर त्याची पत्नी गृहस्थाश्रमाप्रमाणे अतिथी अभ्यागतांची सुद्धा मनोभावे विचारपूस करीत असे. एके दिवशी अमावस्येला पितरांचे श्राद्ध होते. त्याची शाक-पाक तयारी झाली होती. एवढ्यात दारावर "ओम भवती" अशी हाक आली. भर दुपारची वेळ दारावरील अतिथी परत जाऊ नये अशी शिकवण कारण ही वेळ श्री दत्तात्रेयांच्या भिक्षेची असते. कोणत्या स्वरूपात दत्त येतील याचा नियम सांगता येत नाही. आपळ राजाच्या पत्नीने क्षणाचाही विलंब न करता भिक्षा वाढली. घरी श्राद्ध आहे. ब्राम्हण भोजन झाले नाही. अशा वेळी भिक्षा वाढणे चुकले की काय असे वाटत असताच त्या याचकाने स्वतःचे रूप प्रगट केले. ते प्रत्यक्ष श्री दत्तच होते. त्यांनी जाणले की घरी श्राद्ध आहे आणि त्याआधी विप्रस्त्रीने आपल्याला भिक्षा वाढली आहे. हे पाहून दत्त प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले, माते तू चिंतीत आहेस. विप्रस्त्री म्हणाली देवा तू प्रत्यक्ष नारायणच आहेस. न मागता बिभीषणाला राज्य दिलेस ध्रुवाला अढळ पद दिलेस. माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर. दत्तात्रेयांनी अत्यंत करुणेने त्या विप्रस्त्रीला हात धरून उठविले आणि म्हणाले माते उठ चिंता करू नकोस. तुझी इच्छा पूर्ण करतो, माग! काय देऊ? विप्रस्त्री म्हणाली देवा मला आता तुम्ही माते म्हणालात. हेच सत्य करा, मला पुत्र बहुत झाले बहुत मेले जे वाचले ते आंधळे पांगळे आहेत काय करू असून नसल्यासारखेच. "देई सूत सुबुध नाथ, नसता फजिती जनात." अशी प्रत्येक मातापित्यांची इच्छा असते. दत्तात्रेयांनी वर दिला. तुला पुत्र होईल माझ्यासारखा तुझ्या वंशाला उद्धारणारा होईल आणि या कलियुगात ख्यातिवंत होईल. तथापि तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे दुःख दैन्य याचे निवारण करील. एवढे बोलून दत्त अदृष्य झाले. ही हकीकत तिने आपळराजाला सांगितली. तो म्हणाला छान झाले मध्यानाला दत्तच येत असतात. पण दुपारच्या वेळी कोणत्याही वेषात ते भिक्षेसाठी येतात. तेव्हा मला न विचारता त्यांना भिक्षा देत जा ! ती म्हणाली नाथा आज श्राद्ध आहे. ब्राम्हण भोजन झाले नाही. तरीही मी भिक्षा घातली. आपळराजा विद्वानच होता. तो म्हणाला श्राद्ध करून पित्रांच्या नांवे सर्व कर्म करून ते श्री विष्णूलाच समर्पण करावे लागते. प्रत्यक्ष विष्णुंनीच येऊन श्राद्धात भक्षण केले त्यामुळे माझे पितरही तृप्तच झाले असतील. मन प्रसन्न झाले आणि तशातच विप्रस्त्री गर्भिणी झाली. नवमासांचा कालखंड उत्तम प्रकारे व्यतीत झाला आणि एके शुभ दिनी तिला पुत्र झाला. विप्राने जातकर्म केले आणि ज्योतिषांना बोलावून योग्य संस्कार केले. जातकर्म हा सोळा संस्कारापैकी महत्वाचा संस्कार आहे. मात्र आज तो प्रचलित नाही. असो ज्योतिषांनी जन्म लग्न पाहून सांगितले की हा मोठा तपस्वी आणि दीक्षाकर्ता जगद्गुरू होईल. सात वर्षे पूर्ण झाल्यावर श्रीपादांची मुंज झाली आणि गायत्री प्रबोध होताच तो अत्यंत ज्ञानी झाला चार वेद सहा शास्त्रे मुखोदगत म्हणू लागला त्यामुळे आसपासचे विद्वान ब्राम्हणही शिकण्यास येऊ लागले. श्रीपाद त्यांना वेदांत भाष्य सांगत होते. श्रीपाद हे दत्तावतार असल्याने अशक्य ते काय? अशाप्रकारे सोळा वर्षे झाल्यावर माता-पिता त्यास विवाह करू म्हणाले. श्रीपादांनी उत्तर दिले माझे नाव तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ ठेवले त्याचा अर्थ ध्यान्यात घ्या. मी ब्रम्हचारीच राहणार. श्रीपादांचा अधिकार एवढा मोठा होता की त्यांची इच्छा कोणी मोडत नसे. माता पिताही गप्प बसले पण नंतर म्हणाले आमचे सर्व पुत्र स्वतःच असहाय्य आहेत ते आम्हाला सांभाळू शकत नाहीत. आम्हालाच त्यांचा सांभाळ करावा लागतो. तुझ्यामुळे आशा पल्लवित झाल्या होत्या. तू तरी आम्हा सर्वांचे रक्षण करशील पण तू आम्हाला निराश केलेस. असे म्हणताच श्रीपादांनी आपल्या बांधवांवर अमृतदृष्टी टाकली आणि त्यांना सक्षम सुविद्य केले आणि म्हणाले. आता तुमचे दैन्य गेले ऐश्वर्य संपन्न जीवन जगा. मातापित्यास ही सांभाळा त्यामुळे तुम्हीही संसारसागरातून मुक्त व्हाल. आणखी आशीर्वाद दिला की या पुत्रांना कन्यापुत्र होतील तुम्ही डोळ्यांनी पहाल आता तरी मला निरोप द्या . मला तीर्थाटन करण्याची परवानगी द्याल ना. मला अनेकांना दीक्षा द्यावयाची आहे. असे म्हणून श्रीपाद श्री वल्लभ मनोवेगाने गोकर्ण क्षेत्राला आले. हा त्रिमूर्ती दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्री वल्लभ म्हणून प्रसिद्ध झाला. इथे पाचव्या अध्यायाची समाप्ती झाली.
*II श्री दत्तात्रेयार्पणमस्तु II*