• गुरुचरित्र ||अध्याय नववा||

*!! श्री गणेशाय नमः !!*
*!! श्री गुरूदेव दत्त !!*
*श्री गुरुचरित्र अर्थ व बोध*
*अध्याय नववा*
*श्रीपाद अवतार समाप्ती*

कुरवपुरात श्रीपादांचा मुक्काम असतांना पुढे काय झाले. आणखी कुणावर कृपा केली असा प्रश्न नामधारकाने सिद्धांना विचारला. प्रश्न विचारल्याशिवाय कथेचा विस्तार होत नाही. शंका उपस्थित झाल्याशिवाय विस्तार होत नाही. प्रश्न सुद्धा आदराने प्रेमभावाने विचारावा लागतो. आदरभाव नसतांना प्रश्न विचारणे म्हणजे कुतर्क तरी असतो. किंवा विवाद तरी असतो. प्रश्न विचारणारा चांगला ज्ञानी असला तर पृच्छक व बोधक यांच्यात सुसंवाद होतो. विचारणारा अज्ञानी असला तर तिथे गुरूशिष्यत्व निर्माण होऊन उदबोध होईल. प्रश्नकर्ता कुबुद्धी असेल तर मात्र खंडन-,मंडन न होता रणकंदन होईल. म्हणून प्रश्न कर्त्याने ज्ञान मिळवण्याची इच्छा असेल तर सेवाभाव ठेऊन प्रश्न विचारावा. नामधारक हा आदर्श गुरुभक्त आहे. शिवाय आपल्याला मिळणाऱ्या उत्तरातून लोकोपकार व्हावा अशीही त्याची दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे एखादे वेळी सिद्ध नामधारकाला जास्तीची माहिती सुद्धा देतात. सिद्ध म्हणतात. श्रीपाद योगी नित्य कृष्णा नदीवर स्नानाला येत असत. कृष्णेच्या प्रवाहात मध्यभागी जाऊन ते स्नान करीत त्यावेळी तिथे एक रजक धोबी कपडे धूत असे. एके दिवशी श्रीपादांनी त्याला आशिर्वाद दिला. जा आतापर्यंत खूपच कष्ट केलेस. रोज मला नमस्कार केल्याने मीही प्रसन्न झालो आहे. जा! आता सुखाने राज्य कर ! रजकाने मनाशी खूप गाठ बांधली. पण त्याचा नित्यक्रम सुरूच होता. श्रीपाद स्नानाला यायचे रजक त्याचवेळी येऊन नमस्कार करायचा आणि कपडे धुऊन जायचा. एकदा त्याचवेळी उन्हाळ्याच्या दिवसात एक म्लेंच्छ राजा आपल्या परिवारासहीत गंगेत जलक्रीडा करीत करीत आला त्याचे सोबत शेकडो हत्ती, घोडे, सैनिक त्याच्या रक्षणार्थ होते. त्याच्या सोबत सुंदर सुंदर स्त्रिया होत्या. त्यांचे अंगावर लाख-मोलाचे रत्न सुवर्ण अलंकार होते. हे सर्व मनोहर दृष्य पाहून रजकाच्या मनात आले, असे ऐश्वर्य नसले तर जन्म व्यर्थच आहे. या राजाने पूर्वजन्मी नक्कीच ईश्वरभक्ती केली असेल कोणता देव आराधिला असेल की, ज्यामुळे त्याला हा राज्य योग आला किंवा कोणी महान गुरु भेटले असतील त्यांच्या सेवेमुळे त्याला हे ऐश्वर्य मिळाले असेल? काही असो हे पूर्वजन्मीचे फळ आहे हे निश्चित. त्याच्या मनाची चलबिचल पाहून श्रीपाद योगींनी त्याला बोलविले आणि विचारले काय रे रजका काय विचार करतो. रजक म्हणाला राजाचे ऐश्वर्य पाहून संतोष झाला. आणि वाटले की हा पूर्वी नक्कीच श्री गुरूंचा दास असावा. कारण गुरुकृपा झाल्याशिवाय असा योग येत नाही. "तुला हवे असे राज्य" देवा तुमची चरणसेवाच परमेश्वर सौख्याची वाटते. मला माझ्या देहाचीही काळजी नाही. अरे हे सगळे राज्य भोग तमोवृत्ती आहे. ही वृत्ती मोक्ष मार्गात अडथळा होत असते. तमोवृत्ती म्हणजे ऐहिक सुखोपभोगांची इच्छा ह्या वासना भोगून संपवल्याशिवाय मन निवृत्त होत नाही. निवृत्त भोग झाल्यावर प्रवृत्त मोक्ष होता येते. सर्व प्रकारचे भोग अनिर्बधपणे आणि विपुल प्रमाणात म्लेंच्छ वंशातच भोगता येतात. म्लेच्छ म्हणजे कदाचित मुसलमान. कारण ब्राम्हण वंशात भोग वैगेरे ऐहिक सुखे वेगवेगळ्या धर्मबंधनाने सीमित केलेली आहेत. त्यामुळे तृप्ती सुद्धा विलंबानेच होते. किंबहुना इंद्रिभोगाची तृप्ती तिथे अपेक्षितच नाही. सात्विकतेची चौकट राखून राजस आणि तामस वृत्ती ठेवावी लागली.
या साऱ्या गोष्टींचा विचार करून श्रीपादांनी रजकाला म्लेंच्छ म्हणून जन्म घे आणि राज्य भोग असे सांगितले आणि विचारले कि याच जन्मात तुला हे हवे की पुढील जन्मी. राज्यभोग किंवा सर्वच सुखे भोगण्यासाठी आधी शरीर धड हवे म्हणून रजकाने पुढील जन्माची मागणी केली. रजकाला श्रीपादांनी परवानगी दिली. रजक म्हणाला स्वामी हे सगळे ठीक आहे. पण तरीही मला तुमच्या चरणाशी राहावयाचे आहे. त्या सेवेत अंतर करू नका. तथास्तु! श्रीपाद म्हणाले. चिंता करू नकोस. मी नृसिंह सरस्वती नावाने पुढे अवतार घेईन आणि तिथे आपली भेट होईल. पुढे त्या रजकाचे प्राणोत्क्रमण झाले आणि तो विदुरा नगरीत जन्म पावला. श्रीपाद श्रीवल्लभांनी सुद्धा कुरवपुरातच अवतार समाप्तीचा विचार केला. अश्विन वद्य द्वादशीला मृग नक्षत्र असतांना श्रीपादयोगी गंगेत अदृष्य झाले. तिथे अदृष्य झाले तरी दृष्टांत रूपाने त्यांनी त्यांचे अस्तित्व कुरवपुरात असल्याचे दाखवून दिले. तो कथाभाग पुढच्या अध्यायात येईल. इथे आता नवव्या अध्यायाची समाप्ती झाली.

*II श्री दत्तात्रेयार्पणमस्तु II*