•गुरुचरित्र ||अध्याय सहावा||

*!! श्री गणेशाय नमः !!*
*!! श्री गुरूदेव दत्त !!*
*श्री गुरुचरित्र अर्थ व बोध*
*अध्याय सहावा*
*गोकर्ण महात्म्य*

मागील अध्यायात श्रीपादयोगी तीर्थ हिंडत हिंडत गोकर्ण क्षेत्रात आल्याचा उल्लेख केला आहे. नामधारकांनी सिद्ध मुनींना पुन्हा पुन्हा प्रश्न केला की गोकर्ण क्षेत्राचे काय वैशिष्ट्य आहे? यावर सिद्ध म्हणाले गोकर्ण तीर्थात श्री शंकर वसतात. त्यामुळे स्थानाचे अधिक महत्व आहे. तुला त्याची इत्यंभूत हकीकत सांगतो ते ऐक. येथे महाबळेश्वर लिंगाची स्थापना प्रत्यक्ष श्रीगणेशांनी केली आहे. याचे आख्यान सांगतो ते ऐक. पुलत्स्य नावाच्या ब्राम्हणाची एक मुलगी जिचे नाव कैकया होते तिचा पुत्र रावण होता. रावण सर्वांनाच माहित आहे, आणि रामाचे गुरु वसिष्ठ सुद्धा माहित आहेत. शिवलिलामृतात रावणाला वसिष्ठाचा नातू म्हटले आहे. वस्तुतः पुलत्स्य, पुलह क्रतू, वसिष्ठ हे ब्रम्हदेवाचे सात मानसपुत्र आहेत हे आपण मागे पाहिले. त्यातील पुलत्स्याची मुलगी कैकया व तिचा पुत्र रावण अर्थात हा पुलत्स्याचा नातू झाला. पण रामायणाच्या संदर्भात वसिष्ठांचा परिचय सर्वांना आहे. ओळख सांगताना प्रतिष्ठित प्रस्थापित संदर्भ देण्याची पद्धतच आहे आणि ते अपरिहार्यही आहे. वसिष्ठ आणि पुलत्स्य हे बंधू आहेत. त्यामुळे रावण पर्यायाने दोंघांचाही नातूच ठरतो. असो. ह्या रावणाच्या आईला म्हणजे कैकयाला शिवपुजनाचे व्रत होते. प्रदोष व्रत असे त्यास म्हणतात. यात पार्थिव लिंग म्हणजे मृत्तिकेचे लिंग करून त्याची पूजा करायची असते. त्यामुळे कैलासपदाची प्राप्ती होते काय असा प्रश्न नास्तिक बुद्धिवाद्यांना पडणे शक्य आहे. मात्र आपला विषय "श्रीगुरुचरित्र" आहे आणि त्याला भक्तीचे श्रद्धेचे अधिष्ठान हवे. तर्कच करायचा झाला तर स्वर्ग, मोक्ष, कैलास, वैकुंठ हे लोकच नाहीत असे गृहीत धरले तरी मनाची तृप्तता मनाची शांती मनाची तल्लीनता जी म्हणतो ती हीच असे मानण्याला वाव आहे. सृष्टोपत्तीच्या वेळी १४ लोक निर्माण झाले व ते आपल्या भूमंडळाला केंद्र वरती मानून वर ७ व खाली ७ आहेत. हे पहिले तेव्हा कसेही मानले वास्तवास अथवा मनात तरी सर्वोच्च आनंद देणारे ठिकाण असे तरी कैलासाला नक्कीच म्हणता येईल. अशा या आनंदप्राप्तीसाठी रावणाची माता लिंगपूजा करीत होती. रावण लंकाधीश आहे. त्याला स्वतःला लाज वाटली माझी माता मातीशी निष्ठा राखते! ज्याची सोन्याची नगरी आहे त्याच्या मातेने असे हलके विचार ठेवावे! रावण हा श्रीमदांध आहे. त्याला सर्व काही मी बाहुबल व ऐश्वर्याने मिळवू शकतो असे वाटते. त्याच्या मातेला भौतिक ऐश्वर्य व पारमार्थिक ऐश्वर्य यातील फरक कळतो. म्हणूनच ती ऐश्वर्यात लोळत असताना परमेश्वर चिंतनात निमग्न असते. रावण मातेच्या पूजेसाठी प्रत्यक्ष कैलास पर्वतासहित उमा महेश्वरच आणतो असा निश्चय करून शिवपुरी आला. आपली २० बाहूंची शक्ती लावून त्याने कैलास शिखराला उखडले आणि पूर्ण उपटण्यासाठी हलवू लागला त्यामुळे प्रलयासारखी स्थिती निर्माण झाली. सर्व देव गण भिऊन शंकराकडे विनवू लागले. की हा काय प्रकार आहे. हे महादेव हे थांबवा ! शंकराने डाव्या हाताने दाबले आणि रावण शिखराखाली दबला. रावणाने करुणा भाकल्यावर पर्वताच्या कचाट्यातून सुटला मात्र कैलास मिळवण्याची इच्छा कायम होती. आता शक्तीने हे साध्य होत नाही. हे कळाल्यावर त्याने भक्तीचा आरंभ केला. रावणाने श्री शंकराची स्तुती करण्यास प्रारंभ केला. रावण हा वेदवेत्ता आणि सर्व शास्त्र कलांचा अभिज्ञाता होता. त्यामुळे त्याने शंकराची स्तुती करतांना नऊ रस, ३६ राग यांचा उपयोग करून रावणाने शंकराची स्तुती केली. नऊ रसांचे वर्णन. सप्तस्वरांचे वर्णन हे मुळातून वाचले तर एखाद्या संगीताच्या विद्यार्थ्याला विधवाचस्पती होण्यासाठी उपयुक्त माहिती ठरेल. एवढी त्याची महती आहे. इतके ज्ञान असलेला तो रावण आहे. हे मात्र निश्चितच गर्हणीय वाटते. प्रत्येक स्वरांच्या निर्मितीची स्थाने खुलासेवार सांगितली आहेत. कोकिळेचा पंचम स्वर सर्व ज्ञात आहे. मात्र बिभत्स रसाची निर्मिती करणारा कृष्णवर्णी ललाट स्थानी नाद येणारा असा बेडकासारखा स्वर धैवत आहे हे सुद्धा इथे समजते. अशा अनेक प्रकारे केलेल्या स्तुतीमुळे श्रीशंकर प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले. देवा माझ्या पाशी सर्व काही आहे. लक्ष्मीचं जिथे माझी दासी आहे. तिथे मला काय कमी असणार आहे. मला काही नको माझी माता रोज तुमच्या पूजनाची अभिलाषी आहे. म्हणुन मला तुमच्यासहित कैलासच लंकेला न्यायचा आहे. शंकराने समजूत घालून त्याला आत्मलिंग दिले आणि सांगितले. ह्याची ३ वर्षे पूजा करणारा प्रत्यक्ष माझेच रूप होईल. पण रस्त्यात कुठेही ठेऊ नको म्हणाले. रस्त्यात जातांना संध्याकाळ झाली आणि तिथेच नारदमुनी भेटले ते म्हणाले असे कसे? तू चतुर्वेदी आहेस आणि संध्या समयी मार्गक्रमण करतोस हे बरे नव्हे तेव्हा नदी तटाकी चल दोघेही संध्यावंदन करू. रावणासारखा महाबली अतिक्रूर आणि ऐश्वर्य संपन्न व्यक्ती सुद्धा वैदिक नियमांचे पालन करण्याविषयी कशी तत्पर होती हे इथे ध्यानात घेण्यासारखे आहे. आज आम्ही मात्र शाळा, कॉलेज, ऑफिस, व्यवसाय, राजकारण केव्हा कोणतेही कारण सांगून वेळ नाही म्हणतो. स्वधर्मपालन आणि सदाचार हेच माणसाला उन्नत अवस्थेला नेऊन ठेवतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे. असो, रावण संध्या करण्यासाठी नदीतीरी बसला आणि गणेशाला ते लिंग घेऊन उभे राहण्यास सांगितले. कारण लंकेला पोहचल्यशिवाय लिंग जमिनीवर ठेवायचे नाही. अशी महादेवांची आज्ञा होती. श्री गणेशाने अट घातली मी लिंग घेईन पण जड झाले तर
तीन वेळा हाक मारीन तुम्ही न आलात तर मात्र मी ते जमिनीवर ठेवीन. नेमके अर्घ्य प्रदानाचे वेळी गणेशाने आवाज दिले आणि चवथ्या हाकेला जमिनीवर ठेवले तीच त्या लिंगाची स्थापना झाली. रावणाने पुन्हा उचलण्यासाठी प्रयत्न केले पण लिंग हलले नाही. रावणाने वेगवेगळ्या तऱ्हेने उचलण्याच्या प्रयत्नात त्याचा आकार मात्र गायीच्या कानासारखा झाला म्हणून त्याला गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात. स्कंद पुराणात या गोकर्ण क्षेत्राचे सविस्तर वर्णन आहे. श्री गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्री का आले त्याचा महिमा वर्णन करण्यासाठी हा अध्याय आहे. इथे श्रद्धेचे फळ जसे सांगितले तसे ज्ञानी जनांच्या ईश्वर भक्तीचा प्रकारही सांगितला आहे. तसेच श्रीगणेशाला "विघ्नेश्वर" का म्हणतात हे हि कळले. हा जसा त्याची पूजा न केल्यास, त्याला अग्रमान न दिल्यास "विघ्नेश्वर" होतो तसाच तो "विघ्नांतक" ही होतो आणि अनेक संकटाचा नाश करून भक्तांना तारक ठरतो. सहाव्या अध्यायाची इथे समाप्ती होते.

*II श्री दत्तात्रेयार्पणमस्तु II*